• Mon. Nov 25th, 2024

    भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…

    भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले असताना ‘छगन भुजबळ यांचे भाषण मी ऐकलेच नाही,’ असे अजब तर्कट अजित पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मांडले. ‘समोरच्या लोकांना भाषण ऐकायला जाईल, अशी स्पीकरची रचना होती. मी मागे बसल्याने ते भाषण मला ऐकू आले नाही,’ अशी टिप्पणी करून अजितदादांनी नेहमीच्या शैलीत हसत हसत हा विषय टाळला.

    तेलगी प्रकरणात आरोप झाल्यानंतर माझा राजीनामा घेतला गेला. मात्र, तुम्ही राजीनामा दिला नाही. दादा कोंडके यांच्यासारखे द्विआर्थी विनोद करू नका. भाजपसोबत सकाळचा शपथविधी हा कसला गुगली होता, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी पवार यांच्यावर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भुजबळ यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी तुमच्या उपस्थितीत तुमच्या दैवतावर टीका केल्याकडे पत्रकारांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले असता, ‘छगन भुजबळ यांचे भाषण मी ऐकलेच नाही,’ अशी चमत्कारिक भूमिका त्यांनी घेतली.

    भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखावू नये, भुजबळांच्या खळबळजनक भाषणावर अजितदादांची प्रतिक्रिया

    ‘समोरच्या लोकांना भाषण ऐकायला जाईल, अशी स्पीकरची रचना होती. भुजबळ यांनी पवार साहेबांवर काय टीका केली, याची मला कल्पना नव्हती. यासंदर्भातल्या बातम्या मी नंतर वाचल्या. भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेऊन प्रत्येक नेत्याने योग्य भाषेत भूमिका मांडली पाहिजे. विचार वेगळे असले तरी भाषेची पातळी आणि सुसंस्कृत राजकारण कोणीही सोडू नये, असे सांगून अजितदादांनी वेळ मारून नेली.

    दरम्यान, ‘राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नियोजन सुरू आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग अनेकवेळा करण्यात आला तरी म्हणावे तसे यश आलेले नाही. पावसाचा अंदाज घेऊन नियोजन करण्यात येईल,’ असंही अजित पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed