• Sat. Sep 21st, 2024

अंबडमधील खुनाची ‘कॉपी’ टळली; पंचवटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांना अटक

अंबडमधील खुनाची ‘कॉपी’ टळली; पंचवटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘छोटी टिप्पर गँग नावाने भाईगिरी करणाऱ्या ओम पवार ऊर्फ ओम्या खटकीच्या सोबत का राहतो?’ अशी कुरापत काढून २६ जून रोजी केटीएचएम कॉलेजबाहेर मारहाण झालेल्या तरुणाने त्यावेळचा राग डोक्यात ठेवत अंबडमधील खुनाची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचवटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांना अटक करण्यात आली, तर अंधारात दोघे पसार झाले. त्यामुळे मारहाण करणाऱ्यासह साथीदाराची लूट करून खुनाची घटना टळली.

काय घडलं?

पंचवटी पोलिसांनी सागर हेमंत सोनार (वय १९, रा. चुंचाळे शिवार), तुषार बाळू खैरनार (२३, पाथर्डी फाटा) आणि आविष्कार रमेश घोरपडे (१९, जळगाव) या संशयितांना अटक केली. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने ही कारवाई केली. हे संशयित रविवारी (दि. २७) मध्यरात्री कुमावतनगरमधील पाटाच्या परिसरात जमले. त्यांनी ऋषीकेश गणेश परशे ऊर्फ ऋषिबाबा (कुमावतनगर) यासह साथीदाराचा खून करण्याचा डाव आखला. मात्र, तो तडीस नेण्यापूर्वीच सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक योगेश माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक काकड यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे खुनाची ‘कॉपी’ टळली.

नेमके प्रकरण काय?

ऋषीकेश परशे याच्यासह दहा-पंधरा जणांनी २६ जूनला ओम्या खटकीसोबत का राहतो, असे विचारून सागर सोनार याला मारहाण केली होती. चार दिवसांनी ऋषीकेशने फोनवरून सागरला शिवीगाळ, दमदाटी केली. हा राग सागरसह इतर संशयितांच्या डोक्यात होता. गुरुवारी (दि. २४) संशयित ओम्या खटकीने त्याला मारहाण केलेल्या संदीप आठवलेची हत्या केली. त्याच घटनेची ‘कॉपी’ करून ऋषीकेशचाही ‘काटा’ काढण्याचा डाव संशयित सागरसह इतरांनी आखला. मात्र, तत्पूर्वीच, पोलिसांनी त्यांना अटक केली.
खुनाच्या घटनेवरुन सिडकोत रिअ‍ॅक्शन; वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुले ताब्यात
दोन जणांचा खून करण्याच्या उद्देशाने संशयित पंचवटी भागात आले. त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. दीड किलोमीटरपर्यंत पोलिस पथकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्याकडून कोयता, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पूड हस्तगत केली. इतरांचा शोध सुरू आहे.-अनिल शिंदे, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed