• Sat. Sep 21st, 2024
मंदिराला घेराव घालून राष्ट्रसंतांना केली होती अटक; चिमूर स्वातंत्र्य लढ्यातील घटनेला आज ८१ वर्षे

चंद्रपूर : १९४२च्या भारत छोडो आंदोलनाची सर्वात पहिली दखल चिमूरमध्ये घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहासात चिमूर क्रांती हे पर्व महत्त्वपूर्ण आहे. ती गाथा आजही अजरामर आहे. ‘चले जाव’ आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. २८ ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी चंद्रपूर येथील स्थानिक भिवापूरच्या मारोती मंदिराला घेराव घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अटक केली. तेथून त्यांना नागपूरला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. सदर घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत.

‘अब काहे को धूम मचाते हो,

दुखवाकर भारत सारे,

आते है नाथ हमारे’

झाड झडुले शस्त्र बनेंगे,

भक्त बनेंगी सेना,

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,

नाव लगेगी किनारे’

हे भजन गात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ऑगस्ट क्रांती आंदोलनातून स्वातंत्र्याचा संदेश सर्वदूर पोहचविला. चिमूरचे सारे लोक भारावून गेले. त्यातूनच स्वातंत्र्यासाठी भारतीयांची मने पेटून उठली. त्यामुळे राष्ट्रसंतांची ही भूमिका स्वातंत्र्यलढ्यात मोलाची ठरली. महाराजांच्या त्या धीर-गंभीर वाणीने जनमानसात जळजळीत लाव्हारस ओतला गेला. परिणामी इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून १९४२ मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी का होईना पण तेव्हा पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १६ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी राष्ट्रसंतांची चिमूर येथून निघालेली मोटार सरळ भिवापूरच्या मारोती मंदिरासमोर येऊन पोहचली. चंद्रपूरकरांनी चातुर्मास कार्यक्रमासाठी महाराजांना विशेष आग्रह करून निमंत्रण दिले होते.

२८ ऑगस्ट रोजी सायरनच्या आवाजासह मंदिरासमोर पटापट तीन पोलिस गाड्या येऊन थांबल्या. त्यांनी मंदिराला घेराव घातला. सर्व अधिकारी पटापट आत शिरले. महाराज झोपडीत होते. ‘महाराज प्रार्थनेला बसले आहेत’ असे पहारेकरी सेवकाने सांगितले. महाराजांनी आतून ‘आने दो !’ असे म्हणताच अधिकारी आत शिरले. महाराज उघड्या अंगावर केवळ दुपट्टा घेऊन बाहेर पडले. तेथून पुढे त्यांना नागपूरला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी आवाज उचलला. सुमारे शंभर दिवसांनी त्यांची सुटका झाली. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांत त्यांना बंदी होती, अशी माहिती ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी दिली.

‘गॅझेटिअर’मध्ये चिमूर क्रांती विस्तृतपणे मांडावी

चंद्रपूर जिल्ह्याचे ‘गॅझेटिअर’ पहिल्यांदाच आता मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे. सदर ‘गॅझेटिअर’ अंतिमरित्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सूचना व अभिप्राय नोंदविण्याकरिता उपलब्ध आहे. त्यात चिमूर क्रांती विस्तृतपणे समाविष्ट करण्याची मागणी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक डॉ. अनंत हजारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed