• Sat. Sep 21st, 2024

पोलीस ठाण्यात जाण्याची कटकट मिटली; भाडेकरूंची माहिती भरा ‘ऑनलाइन’, नवी मुंबई पोलिसांची सुविधा

पोलीस ठाण्यात जाण्याची कटकट मिटली; भाडेकरूंची माहिती भरा ‘ऑनलाइन’, नवी मुंबई पोलिसांची सुविधा

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना, काही घरमालक भाडेतत्त्वावर घर देताना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात पुरवित नसल्याचे आढळून आले आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे सुलभ व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता भाडेकरुंची माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार नाही.

पूर्वी घर भाड्याने दिल्यानंतर घरमालक अथवा संबंधित भाडेकरूच्या अर्जावर स्थानिक पोलिसांकडून शिक्का मारून दिला जात होता. त्यालाच पोलिस एनओसी म्हटले जात होते. मात्र, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अशा प्रकारे पोलिसांकडून एनओसी देण्याचा प्रकार बंद केला आहे. परंतु भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला कळविणे बंधनकारक केले आहे. मात्र, त्यानंतरही काही घरमालक भाडेतत्त्वावर घर देताना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात पुरवत नसल्याचे आढळून आले आहे. तर, काही घरमालक अधिक पैशांच्या लोभापायी घरात बेकायदा परदेशी नागरिकांना भाडोत्री म्हणून ठेवून त्यांची माहिती लपवून ठेवत असल्याचे आढळले आहे. अशा प्रकारे अवैधरीत्या राहणाऱ्या व्यक्ती व परदेशी नागरिकांकडून अमली पदार्थांच्या तस्करीचे तसेच, त्यांच्याकडून इतर प्रकारचे गैरकृत्य होत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत, नागरिकांना घरबसल्या भाडेकरूंची माहिती देणे सुलभ व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी भाडेकरूंची माहिती देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भाजपच्या हर घर जोडो अभियानाला आता शेवटची घर घर लागलीय; विजय वडेट्टीवारांनी डिवचलं

अशी द्यावी माहिती…

नागरिकांना ऑनलाइन अर्ज करून किंवा प्रत्यक्ष संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज सादर करून, अथवा संबंधित पोलिस ठाण्यास रजिस्टर पोस्टाद्वारे अर्ज पाठवून भाडेकरूंची माहिती देता येणार आहे. ऑनलाइन माहिती देण्यासाठी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर भाडेकरूंची माहिती या सदराखाली जावे लागणार आहे. यात जागामालकाचा तपशील, भाड्याने दिलेल्या जागेचा तपशील, भाडेकरूच्या कामाचे ठिकाण, भाडेकरूला ओळखणारे लोक, एजंटची व इतर माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती अपलोड केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्याकडे जाणार आहे.

भाडेकरूने दिलेल्या कागदपत्रांबाबत संशय वाटल्यास, तसेच बांग्लादेशी अथवा परदेशी नागरिक असल्यास तसेच भाडेकरू गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाटल्यास घरमालकाने याची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित भाडेकरूकडून एखादा अपराध घडल्यास घरमालकाला दोषी ठरविले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घर भाड्याने देताना आपल्याकडील भाडेकरूची माहिती आवश्यक कागदपत्रांसह स्वत:कडे ठेवावी. तसेच, त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे स्वत:हून जाऊन, ऑनलाइन नोंद करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी केले आहे.

पोलिसांकडून घर/जागा मालकांसाठी सूचना:

घर/जागा भाड्याने देण्यासाठी पोलिसांच्या कोणत्याही ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

केवळ नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील घर/जागा भाड्याने देण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ओटीपी हा घरमालकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल.

घरमालकाचा पत्ता व भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये.

ऑनलाइन पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा/घरमालक आणि भाडेकरूने खात्री करावी.

पोलिसांना खोटी माहिती पुरवल्यास तसेच, अर्जामधील माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर / घरमालकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Thane Crime: कसारा घाटात मृतदेह, हत्येचा अखेर उलगडा; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed