एका गोष्टीचा आनंद आहे. सगळं जग आपल्या नजरा लावून चांद्रयान ३ उतरणार हे पाहत होतं. ते उतरलं एक ऐतिहासिक काम देशातील तज्ज्ञांनी करुन दाखवलं. इस्त्रोची स्थापना करण्याची भूमिका जवाहरलाल नेहरु यांनी केली. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम असोत आणि नरेंद्र मोदी असोत या सर्वांच्या प्रयत्नानं इस्त्रो आज जगातील सर्वात महत्वाची संघटना बनली. विक्रम साराभाई, होमी भाबा, सतीश धवन अशी अनेक नावं सांगता येतील त्यांनी इस्त्रोसाठी योगदान दिलं, असं शरद पवार म्हणाले.
एका बाजूनं ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला चित्र काय आहे. लोक महागाईनं त्रासलेले आहेत. लोक बेकारीनं त्रासलेले आहेत. या देशात चांद्रयान करण्यासाठी कोल्हापूरच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या लोकांनी कष्ट केले. हे कष्ट करण्याची ताकद असलेल्या नव्या पिढीत बेकारीचं संकट ठिकठिकाणी दिसतं. नवी पिढी घाम गाळायची संधी द्या, असं म्हणतेय.
देशातील शेतीची काय अवस्था आहे. दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा तिथं १८ दिवसात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. प्राण सोडायला शेतकरी तयार होते तेव्हा त्याच्या जीवनात संकट असतं. कारण शेतीमालाला भाव मिळत नाही, कर्ज फेडायची इच्छा आहे पण ताकद नाही, त्याची भांडीकुंडी बाहेर काढली जातात त्यामुळं शेतकरी टोकाला जातो, असं शरद पवार म्हणाले. गेल्या सहा दिवसांपासून आपण रोज वाचतोय कांद्याची काय स्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाची किंमत पाहिजे. कांद्याचा उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडला पाहिजे. त्यासाठी कांदा जगात पाठवला पाहिजे. कांदा भारताच्या बाहेर जात असताना कांद्यावर ४० टक्के कर बसवला आहे. यामुळं देशातल्या कांद्याला जगात ग्राहक मिळेना, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, रस्ता अडवला तरी देखील सरकार लक्ष द्यायला तयार वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की मी कृषी मंत्री असताना कांद्यावर निर्यात कर लादला नाही. कांदा दर वाढला होता त्यावेळी भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते. त्यावेळी त्यांना जिरायती शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावेत म्हणून त्यांना कांद्याच्या माळा घालणाऱ्यांना कवड्याच्या माळा घातल्या तरी दर बदलणार नाही, असं सांगितल्याचं शरद पवार म्हणाले.
सप्टेंबर नंतर साखरेच्या निर्यातीवर प्रतिंबध घातले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केलं, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे बारा महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसले. मोदी सरकारनं शेतकऱ्याकंडे ढुंकून पाहिलं नाही. शेतकऱ्यांचा इतका अपमान देशाच्या इतिहासात कुणी केला नव्हता, असं शरद पवार म्हणाले.