यावेळी शरद पवार यांना शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये केलेल्या त्यांच्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांच्याकडून ‘अजित पवार आमचे नेते आहेत’ असा उल्लेख झाला होता. मात्र, दुपारी साताऱ्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी हे वक्तव्य सपशेल फेटाळून लावले. मी तसं बोललंच नव्हतो. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. तुम्हाला आठवत असेल, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही, आमच्याकडून चुकीची गोष्ट घडली, पुन्हा अशा रस्त्याने जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी म्हणून वेगळा निर्णय घेतला होता. एकदा एखादी भूमिका घेतली असेल आणि करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते, असे त्यांनी म्हटले.
सध्या आमची भूमिका दुसरी आहे. आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्याच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे नेते नाहीत, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवार यांच्या या वक्त्यामुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीतील परतीचे दोर कायमचे कापले गेले असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र, यावेळी शरद पवार यांनी पक्षात फूट पडल्याचे पुन्हा एकदा नाकारले. काही सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याला पक्षांतर म्हणता येईल. त्याला पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.