• Sat. Sep 21st, 2024

आवडत्या ठिकाणी बदली, कॉन्ट्रॅक्टर्सकडून डीजेने स्वागत; पण सरकारी अधिकाऱ्याला थेट निलंबनाचा दणका

आवडत्या ठिकाणी बदली, कॉन्ट्रॅक्टर्सकडून डीजेने स्वागत; पण सरकारी अधिकाऱ्याला थेट निलंबनाचा दणका

जालना : जालन्यातील महावितरण कार्यालयात बदली झाली म्हणून स्वतःची डीजेवर मिरवणूक काढून घेणं महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्यांला चांगलंच महागात पडलं आहे. या अभियंत्यांसह २० ते ३० जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच महावितरणनं देखील या अभियंत्याच्या मिरवणुकीवर नागरिकांनी केलेल्या टीकेनंतर त्याला निलंबित केलं आहे. प्रकाश चव्हाण असं सदर अभियंत्याचं नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण हे आधी जालन्यातील कन्हैयानगर भागातील महावितरण कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या विरोधात ग्राहक आणि नागरिकांच्या तक्रारी आल्यानं त्यांची महिनाभरापूर्वी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली होती. पण तेथून त्यांची पुन्हा बदली जालन्यातील महावितरणच्या फेज थ्रीमध्ये करण्यात आली. बदलीचा चव्हाण आणि त्यांच्या अखत्यारित असलेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना आनंद झाला आणि कॉन्ट्रॅक्टरांनी चव्हाण हे शहरात दाखल होताच त्यांची पोलिसांची परवानगी न घेता डीजेवर डान्स करत मिरवणूक काढली.

४२ लाख रुपये किंमतीचा पाच क्विंटल गांजा जालना पोलिसांनी जाळला

या मिरवणुकीनंतर वाहनांना अडथळा निर्माण करून जिल्हाधिकारी जालना यांचे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासहीत इतर २० ते ३० जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम १४३, १८८, २८३, भा.दं.वि.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच या डीजे मिरवणूक प्रकरणानंतर शहरातील नागरिकांकडून महावितरणवर झालेल्या टीकेनंतर प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश महावितरणने काढले आहे. त्यामुळे ही मिरवणूक अखेर या सहाय्यक अभियंत्यांच्या चांगलीच अंगलट आलेली पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed