• Sat. Sep 21st, 2024

पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला वेग; किती शेतकरी देणार जमीन? काय सांगते आकडेवारी?

पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला वेग; किती शेतकरी देणार जमीन? काय सांगते आकडेवारी?

पुणे : पुण्याला वाहतूक कोंडीच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठीच्या ‘रिंग रोड’साठी १२ हजार शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, त्यापैकी ८५ हेक्टर जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत संमती दिलेल्या शेतकऱ्यांचे निवाडे जाहीर करून आणखी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ‘रिंग रोड’साठी आतापर्यंत संपादित केलेल्या जमिनीसाठी जिल्हा प्रशासनाने ४९१ कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे.

२१ ऑगस्टची मुदत

पश्चिम भागातील रिंग रोडच्या जमिनीचे फेरमूल्यांकन झाल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीसाठीच्या संमतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी संमतीपत्रे देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्या मुदतीपर्यंत पश्चिम भागातील मावळ, मुळशी, हवेली आणि भोर तालुक्यातील एकूण ३५ गावांतील १६ हजार ९४० खातेदार (जमीनधारक) आहेत. त्यांच्या नावावर ७३८.६४ हेक्टर क्षेत्र आहे. एकूण खातेदारांपैकी दिलेल्या मुदतीत १२ हजार १६६ खातेदार शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शविल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२४६ हेक्टर संपादनाचे आव्हान

पश्चिम भागातील ३५ गावांमधील ‘रिंग रोड’साठी २,४५५ गटातील जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी १,७७५ गटातील जमिनीला संमती मिळाली आहे. त्यापैकी आतापर्यंत २१ दिवसांत ४९१ हेक्टर एवढे क्षेत्र ‘रिंग रोड’ला देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे, तर २४६ हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर अद्याप बाकी आहे.

४९१ कोटींचे वाटप

‘रिंग रोड’साठी संमती देणाऱ्या खातेदारांपैकी २३९ गटातील ९१४ खातेदारांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यात आतापर्यंत सुमारे ८४ हेक्टर एवढी जमीन संपादित करून त्यापोटी सुमारे ४९१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये सर्वाधिक मावळ तालुक्यात २१८ कोटी ६१ लाख रुपयांच्या मोबादल्याचे वाटप करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यात ९४ कोटी ३३ लाख; तसेच हवेली तालुक्यात १४९ कोटी रुपये; तसेच भोर तालुक्यात २८ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. मावळ आणि हवेली तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक अनुक्रमे ३८ आणि ३४ हेक्टरएवढी जमीन संपादित करण्यात आली आहे.

३१ ऑगस्टपर्यंत निवाडे निश्चित

मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यात संमती दिलेल्या क्षेत्रातील संपादित जमीन वगळता उर्वरित जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया बाकी आहे. ४९१.७४२ हेक्टर क्षेत्राच्या संपादनासाठी संमती मिळाली असली तरी त्यापैकी आतापर्यत ८४ हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. उर्वरित ४०७ हेक्टर क्षेत्राचे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निवाडे निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पुढील निवाडे निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे भूसंपादन समन्वयक प्रवीण साळुंखे यांनी सांगितले.

संमती देणाऱ्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी अटी टाकल्या आहेत. त्या अटीनुसार पैसे दिल्यास जमीन स्वीकारू असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, विनाअट संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे निवाडे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात येणार आहेत. उर्वरित अटी ठेवलेल्यांची संमती फेटाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.- प्रवीण साळुंखे, समन्वयक, भूसंपादन

नुकसान भरपाई मोबादला वाटपाची स्थिती
तालुका……. गावाची संख्या….. गट संख्या…… संपादित क्षेत्र (हेक्टरमध्ये)………. रक्कम (कोटींमध्ये)

मावळ …………६…………..५८…………………….३८.०२७३………….२१८.६१
मुळशी ………….१३………….५२………………..१३.०५११………….९४.३३
हवेली …………..१४…………९७……………..३४.५४……………..१४९
भोर …………………२………..३२……………१०.४७२९ ……………२८.५७
मित्राने दिला दगा नंतर सावकाराने छळलं; चिठ्ठीत कारण सांगत तरुणाची धक्कादायक एक्झिट, काय घडलं?
आकडे काय सांगतात?

१६ हजार ९४०
रिंग रोडसाठी आवश्यक शेतकऱ्यांचे संमतीपत्र
१२ हजार १६६
जमीन देण्यासाठी संमती दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या
७२ टक्के
रिंग रोडला जमीन देण्यास संमती दिलेल्या शेतकऱ्यांची टक्केवारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed