• Sat. Sep 21st, 2024

सिल्लोडमध्ये भीषण पाणीटंचाई; आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४२ टक्के पावसाची नोंद

सिल्लोडमध्ये भीषण पाणीटंचाई; आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४२ टक्के पावसाची नोंद

नीलेश सोनटक्के, सिल्लोड : तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकला असून, दिवसागणिक पाणीटंचाई वाढत आहे. दोन गावांमधून सहा टँकरचे, तर २१ गावांमधून २४ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झाले आहेत. दमदार पावसाअभावी तालुक्यातील धरणे कोरडी पडली असून, शहरासह तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४२ टक्के पाऊस पडला आहे.

सिल्लोड शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा, निल्लोड, केळगाव, चारनेर-पेंडगाव प्रकल्पांसह उंडणगाव, रहिमाबाद, जळकी-वसई साठवण तलाव कोरडे पडले आहेत. अजिंठा-अंधारीमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील आसडी, अनाड, दीडगाव, धानोरा, मुखपाठ, वांजोळा, बोरगाव बाजार, म्हसला बु., अंधारी, पानवडोद खु., पांगरी, धावडा-चिंचवन, बोरगाव, सारवणी, पिरोळा-डोईफोडा, पिंपळगाव घाट, म्हसला खु., वांगी बु., सावखेडा बु., खातखेडा, सावखेडा खु. या २१ गावांमधून २४ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्याबरोबरच अंधारी येथून पाच, तर डकला येथून एक असे टँकरचे सहा प्रस्ताव दाखल झाले आहेत.

विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव असलेल्या गावांमध्ये उन्हाळ्यापासून पाणीटंचाई असल्याने विहीर अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची मुदत ३० जूनपर्यंत होती. त्यानंतरही तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या झळा कायम राहिल्या. यामुळे या गावांनी विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव पुन्हा दाखल केले.

भीषण पाणीटंचाईच्या पुनरावृत्तीची भीती

तालुक्यात २०१७-१८मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी धरणे कोरडी पडल्याने शहरासह तालुक्याची तहान टँकरने भागवली होती. नेवपूर, पिशोर (कन्नड), रावळा-जावळा (सोयगाव), तोंडापूर (जामनेर) या शेजारच्या तालुक्यांतील धरणांतून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या वर्षी अर्धा पावसाळा सरूनही धरणांमध्ये पाण्याची आवक झालेली नाही. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास तालुक्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अंधारीला टँकरने पाणीपुरवठा

तालुक्यातील अंधारी येथे तीव्र पाणीटंचाई असून, गावाला पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून वाकोद (ता. फुलंब्री) येथील प्रकल्पातून साडेचार कोटी रुपयांची योजना मंजूर करून कामही पूर्ण झाले आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चूनही गाव तहानलेले आहे.
मराठवाड्यात पाणीचिंता; पावसाने दडी मारल्याने लघु प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?
तालुक्यातील आतापर्यंतचा पाऊस
अंभई ३९६ मिमी
सिल्लोड २८७ मिमी
अजिंठा २८६ मिमी
आमठाणा २६९ मिमी
निल्लोड २५८ मिमी
गोळेगाव २२३ मिमी
भराडी २१५ मिमी
बोरगाव बाजार १८७ मिमी
सरासरी पाऊस २७७.६२ मिमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed