संपूर्ण जुलै महिन्यात टोमॅटोचे दर अक्षरश: गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत दर गेला होता. त्यामुळे सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो जवळपास गायब झाला होता. अनेक खानावळी, भोजनालये, हॉटेले, रेस्टॉरंट्समध्ये सॅलडमध्ये टोमॅटो देणे बंद करण्यात आले होते. यंदा टोमॅटोचे उत्पादन घटल्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसला. नागपूरनजीकच्या गावांमध्ये पावसाळ्यात टोमॅटोचे उत्पादन घेण्यात येत नाही. त्यामुळे नागपुरात नाशिक, संगमनेर, औरंगाबाद आणि बेंगळुरूतील मगनपल्लीहून टोमॅटोची आवक सुरू होती. तर बेंगळुरू येथे यंदा टोमॅटोचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. त्यामुळे चढ्या दराने टोमॅटोची विक्री सुरू होती.
सामान्य नागरिकांना यामुळे बसत असलेला आर्थिक मार लक्षात घेत सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर हळूहळू टोमॅटोचे दर कमी झालेत. आता बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. मात्र, टोमॅटोचे दुखणे कमी होत नाही तोच कांद्याने डोके वर काढले आहे. कांद्याचा दर दुप्पट झाला आहे. मागील आठवड्यापर्यंत प्रतिकिलो २० रुपये दर असलेला कांदा आता प्रतिकिलो ४० रुपयांवर पोहोचला आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या काळात हा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या निर्णयाविरुद्ध रोष
देशभरात टोमॅटोंपाठोपाठ कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत जाणवणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.