• Mon. Nov 25th, 2024

    फेसबुकवर मैत्री, नंतर नोकरीचं आमिष; तरुणीने विश्वास टाकला आणि नंतर घडली धक्कादायक घटना!

    फेसबुकवर मैत्री, नंतर नोकरीचं आमिष; तरुणीने विश्वास टाकला आणि नंतर घडली धक्कादायक घटना!

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : फेसबुकवरून मैत्री करून नंतर रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून, चार तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बाब पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात उघडकीस आली आहे. या तरुणींची फसवणूक करणाऱ्या तिघांना कासा पोलिसांनी विविध ठिकाणांहून अटक केली आहे.

    गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमाद्वारे फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात समोर आली आहे. डहाणू तालुक्यातील योगिता महादू चौधरी या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर, एका आरोपीला नाशिकमधून, तर दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन (राहणार बोईसर) हा फेसबुकच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर काही दिवसांत रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपी व त्याचे इतर साथीदार त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असत.

    लडाखमधील आर्मीच्या ट्रक अपघातात ९ जवानांनी प्राण गमावले, साताऱ्याच्या वैभव भोईटेंना वीरमरण, राजाळे शोकाकूल

    योगिता हिने आपल्याला नोकरी लावून देण्यासाठी आरोपीला तब्बल चार लाख रुपये दिले होते. पालघरमधील आणखी तिघांनी या आरोपींना प्रत्येकी चार लाख रुपये दिल्याची साक्ष कासा पोलिस ठाण्यात दिली आहे. विचारणा केली असता आरोपीकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली, तसेच काही दिवसांनंतर आरोपीचा फोन बंद झाला, त्यामुळे योगिताने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

    कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय संदीप नागरे यांनी सापळा रचून मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन याला नाशिकमधून, तर विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या प्रकरणात कासा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    आणखी तरुणांना फसवल्याचा संशय

    या आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून राज्यातील आणखी काही तरुणांनाही फसवल्याचा संशय पोलिसांना आहे. आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास साक्ष द्यावी, असे आवाहन कासा पोलिसांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed