एकीकडे सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठका होत असताना दोन्ही गटातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे आज नाशिकमधील एका रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यात भेट झाल्याचा दावा केला जात आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.
या भेटीसंदर्भात दादा भुसे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, आपल्या कौटुंबिक कामांसाठी मी नाशिकला आलो आहे. तर दुसरीकडे अदित्य ठाकरे यांनाही पत्रकार परिषदेत बोलताना आमच्यात कुठलीही भेट झाली नाही, अशी माहिती माध्यमांना दिली. दरम्यान आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्यातील या भेटीचे वृत्त दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावले असले तरी चर्चेचा धुरळा मात्र अजूनही खाली बसण्यास तयार नाही.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
‘मी पर्यटन मंत्री होतो, तेव्हापासून या रिसॉर्टबद्दल ऐकत होतो. आज येथे येण्याची संधी मिळाली. मागे मी एका लग्नासाठी येथे आलो होतो. या रिसॉर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन एकत्र केलं आहे, म्हणून मी ते बघायला गेलो. छुप्या भेटींची गरज नाही. जे आहेत जगजाहीर असतं. कुणाला दरवाजे बंद ठेवायचे की उघडे ठेवायचे, हे उद्धव साहेब ठरवतील,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.