पेट्रोल प्रति लिटर १०६.०४ तर डिझेल ९२.५९ रुपयांवर कायम आहे. या दरांमध्ये घट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सामान्यांचा विचार करता पेट्रोलचा दर प्रति लिटर शंभर रुपयांच्या आत असायला हवा. मात्र, पेट्रोलच्या दरांमध्ये कुठलाही फरक पडलेला नसताना सीएनजीचे दर कमी झाले आहेत. पारंपरिक इंधनाऐवजी सीएनजी, एलएनजी, एलपीजी आदी अपारंपरिक इंधनांना केंद्र सरकारद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरात आजघडीला सीएनजी, एलपीजी एलएनजीचा पंप कार्यान्वित आहे. रॉमॅट कंपनीचे तीन सीएनजी पंप शहरात आहेत. नागपुरात सीएनजी संचालित ऑटोरिक्षांची संख्या मोठी आहे. दरघटीमुळे ऑटोरिक्षाचालकांच्या चेहरऱ्यावर हसू फुलले आहे.
टप्प्याटप्प्याने घसरण
मागील वर्षी संपूर्ण देशभराचा विचार करता सर्वाधिक महागडे सीएनजी नागपूरात मिळत होते. तेव्हा सीएनजीचा दर प्रति किलो १२० रुपये होता. त्यानंतर ११६, १०६, ९९.९० अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने दरघट दिसून आली आहे.
वाहनांच्या संख्येत वाढ
नागपुरात सीएनजीची पाइपलाइन नाही. त्यामुळे सरकारकडून अनुदान मिळत नाही. गुजरातमधून एलएनजी आणावा लागतो. त्यानंतर नागपुरात सीएनजीमध्ये त्याचे रुपांतर केले जाते. सीएनजी पंपावर आणून विक्री करावा लागतो. गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्यावर खर्च होतो. गेल्या काही वर्षांत शहरात सीएनजीसंचालित वाहनांची संख्या वाढली आहे.
वर्षभरापासून सीएनजीचे दर २६ रुपयांनी कमी
गेल्या वर्षभरात सीएनजीचे दर २६ रुपयांनी कमी झाले आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये एक किलो सीएनजीचा दर १२० रुपयांपर्यंत पोहोचलेला होता. नागपूरमध्ये आज सीएनजीचा दर ८९ रुपये ९० इतका दर आहे. १५ ऑगस्टनंतर १० रुपयांनी सीएनजीचे दर कमी झाले आहेत.
नागपूरमधील ऑटोचालकांनी सीएनजीच्या दरात घसरण झाल्यानं दिलासा मिळाल्याचं म्हटलं. नागपूरकरांनी सीएनजीचे दर कमी झालेले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात व्हावी, अशी भावना व्यक्त केली आहे.