• Mon. Nov 25th, 2024

    नागपुरात पोलीस पाटील भरती प्रक्रियात घोळ? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    नागपुरात पोलीस पाटील भरती प्रक्रियात घोळ? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे घोषित न केल्याने यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

    पोलिस पाटील पदांसाठी २६ जून २०२३ रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लिखित परीक्षा घेण्यात आली. त्याचदिवशी संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांची उत्तीर्ण व अनुत्तीर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, सर्व उमेदवारांच्या यादीमध्ये गुण नमूदच नसल्याने या प्रक्रियेवरच शंका उपस्थित करण्यात येत आहे. परीक्षेत किती गुण मिळाले, हे जाणून घेणे हा त्या विद्यार्थ्याचा अधिकार आहे. याबाबत विचारणा केली असता मुलाखतीनंतर दोन्ही गुण जाहीर केले जातील, असे सांगण्यात आले होते.

    लिखित परीक्षेच्या निकालानंतर मुलाखत घेण्यासाठी लागलेला कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे एवढा उशीर का झाला, हेही संशयास्पद आहे. यात भाजपच्या बुथप्रमुख व इतर कार्यकर्त्यांना शिफारशीनुसार सामावून घेण्यात आले. या प्रक्रियेत सहभागी असलेले उपविभागीय अधिकारी एका माजी मंत्र्यांचे स्विय सहायक असल्याने त्यांनी भाजप समर्थित उमेदवारांनाच प्राधान्य दिले, असा आरोप करीत याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

    अन्यथा उपोषण!

    मुलाखतीला २० गुण होते. यासाठी विचारलेले प्रश्न हे पोलिस पाटील पदासाठीचे नव्हते. घरगुती प्रश्न विचारून चार मिनिटांत मुलाखती घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लिखित परीक्षेचा निकाल घोषित करताना दाखविण्यात आलेली तत्परता मुलाखतीचा निकाल घोषित करताना दाखविली नाही. या प्रक्रियेत घोळ झाला नसेल असे प्रशासनाला म्हणावयाचे असेल तर त्यांनी लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे जाहीर करावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
    चौदा विद्यार्थ्यांना एकाच विषयात झिरो? ‘आयडॉल’चा पुनर्मूल्यांकनाचा निकाल अडल्याने विद्यार्थी हवालदिल
    आरोपांत तथ्य नाही : उपविभागीय अधिकारी

    लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे गुण वेगवेगळे जाहीर केले नसले तरी विद्यार्थांना ते उपलब्ध करून दिले जात आहेत. मुलाखतीचे गुण देणे हा समितीचा निर्णय होता. लेखी परीक्षेत किती गुण मिळाले हे समितीला माहीत नव्हते. त्यामुळे या प्रक्रियेत घोळ झाला, या आरोपात तथ्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed