आमदार शेखर निकम यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी नवीन चेहऱ्याला उमेदवारी देण्यासाठी विचार सुरू आहे. रोहन बने हे संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क, त्यांनी त्यावेळी केलेली कामे, या सगळ्याचा फायदा चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात होईल. पण असे असले तरी ज्येष्ठ आमदार शेखर निकम हे अनुभवी मोठा संपर्क असलेले अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्यासमोर नवख्या उमेदवाराचं आव्हान कितपत असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
आपल्याला पक्ष ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगेल त्या मतदारसंघातून आपण उभे राहू असे यापूर्वी भास्कर जाधव यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासारखा मोठा नेता तिथे आव्हान उभं करू शकतो, अशीही चर्चा आहे. भास्कर जाधव हे यापूर्वी चिपळूण मतदारसंघातून आमदार होते. लोकसभा निवडणुका या विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांतील राजकारणावरती विधानसभेच्या उमेदवारांची अंतिम निश्चिती होणार आहे. पण असे असले तरी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र झाल्यास ऐनवेळची गडबड टाळण्यासाठी ठाकरेंकडून चाचपणी सुरू आहे.
राजापूरमधून उमेदवार कोण?
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना उदय सामंत यांच्यासमोर उमेदवारी देण्याविषयी चर्चा सुरू होती पण आता याविषयी सध्यातरी कोणती चर्चा नाही. राजापूर मतदारसंघातून पुन्हा राजन साळवीच असेही खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे. आयत्यावेळेला उदय सामंत यांच्यासमोर शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हा उत्सुकतेचा विषय आहे. या सगळ्याविषयी पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या शहर मेळाव्यात लोकशाही आहे… विरोधात कोणीही उमेदवार उभा करा… कोणीही इच्छुक राहा… मतदार ठरवतील कोणाला निवडून द्यायचं… असं विधान केलं.
भास्कर जाधव रत्नागिरीतून उभे राहणार?
उद्धव ठाकरे गटाचे नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यासारख्या अभ्यासू व तगड्या आक्रमक शैली असलेल्या उमेदवाराचा विचारही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून केला जाऊ शकतो. भास्कर जाधव यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांना गुहागरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी आमदार भास्कर जाधव प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे विक्रांत जाधव यांच्यासाठी हा मतदार संघ सेफ राहण्याची शक्यता आहे.
ठाकरेंकडे दापोली कोणता पर्याय?
याचवेळी दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार संजय कदम यांना विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात असले तरीही या जागेवर उद्धव ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्सुकता आहे.