• Mon. Nov 25th, 2024
    Chhatrapati Sambhajinagar News LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

    म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: वर्षानुवर्षे नियोजनाचा अभाव असल्याने शहरवासीयांना नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दीड महिन्यांपासून कोलमडले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीबाणीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

    जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहरात वितरण व्यवस्थेत महापालिका प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे गेल्या दोन दशकांत एक, दोन आणि आता चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात वेळापत्रक पुरते बिघडले होते. बहुतांश वसाहतींमध्ये आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. जून महिन्यात पाण्याचे वेळापत्रक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. पालिका प्रशासकांनी किमान वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करावा याबाबत आदेश दिले होते. पण पालिकेची यंत्रणा याबाबतही कुचकामी ठरली. दीड महिन्यांपूर्वीपासून तांत्रिक बिघाड, पंपहाउसमध्ये बिघाड होणे, धामण अडकणे, जलवाहिनी बिघडणे आदी कारणांनी शहराचा पाणीपुरवठा पुरता विस्कळित झाला आहे. ऐन सणासुदीत शहरवासीयांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सिडको एन चारसारख्या उच्चभ्रू वसाहतीत तर ड्रेनेजमिश्रित पाणी मिळत आहे. पालिकेची यंत्रणा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात हतबल ठरल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नागरिक पाणीबाणीमुळे त्रस्त झाले आहेत. पाण्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे का ढकलले गेले याबाबत पालिकेकडून कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे वैतागात भर पडल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. विशेष म्हणजे या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक एकही शब्द बोलत नाहीत. केवळ निवडणुका, राजकीय स्वार्थ आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणीप्रश्नावर रान उठवले जाते. इव्हेंट साजरा केला की सर्वच पक्ष पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यातून नेमका मार्ग कधी निघणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

    प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढणार

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे २०२४ची निवडणूक अकोला मतदारसंघातून लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर त्यांना विजय मिळाला. स्वबळावर त्यांना विजय मिळविता आला नसल्याचे दिसून आले. हीच स्थिती काँग्रेसचीही आहे. विजयी विश्वास व्यक्त करताना अॅड. आंबेडकर हे आगामी कुणासोबत जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मध्यंतरी शिवसेना (ठाकरे गटा)सोबत आघाडी झाल्याची चर्चा होती. यानंतर महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचेही बोलले जात होते. अॅड. आंबेडकर यांनी या विषयावर कुठलेही मत मांडलेले नसल्याने गूढ कायम आहे. मुळात अॅड. आंबेडकर यांनी भारिप बमसंच्या माध्यमातून बहुजन व दलित समाजाची मोट बांधून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये मोठे यश मिळविले आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्यासोबत आहे. बाबासाहेबांचे वंशज म्हणून दलित समाजाचे एक गठ्ठा मतदान त्यांना होते. मुस्लीम समाजाने साथ दिल्यास विजय निश्चित मानला जातो.

    दरम्यान, अकोला जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मध्यंतरी काँग्रेस नेत्यांच्या आपसातील वादामुळे भाजपला बळ मिळाले. लोकसभेसह विधानसभा व महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या. तरीही वंचित बहुजन आघाडीने आपला दबदबा कायम राखला आहे. वंचितला काँग्रेसची जोड मिळाल्यास भाजपसमोरील आव्हान वाढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    नऊमध्ये दोन विजय

    अकोला लोकसभा मतदारसंघातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १९८४मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. १९९८ आणि १९९९ची लोकसभा त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून लढविली. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. २०१९मध्ये त्यांनी अकोला व सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघातून एकाच वेळी निवडणूक लढविली. मात्र या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. येत्या २०२४मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून दहाव्यांदा निवडणूक लढविणार आहेत.

    भाजपच्या उमेदवाराकडे लक्ष

    मागील चार टर्मपासून अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचे संजय धोत्रे यांच्या ताब्यात आहे. सध्या प्रकृती अस्वस्थतेमुळे धोत्रे निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्याने भाजप नवा चेहरा आणण्याच्या तयारीत आहे. या चेहऱ्यावर अॅड. आंबेडकर यांच्या विजयाची वाट बिकट की सोपी हे ठरणार आहे. महाविकास आघाडीने साथ दिल्यास समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

    सिडको बसपोर्टला लागेना महूर्त

    सिडको बस स्थानकाच्या जागेवर सोलापूरच्या धर्तीवर बसपोर्ट बांधण्याची घोषणा करण्यात आली. सिडको बसस्थानकात ३० फलाटांचे बस स्टॅण्डसह आगारासाठी जागा देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. सिडको बस पोर्ट हे ‘डीबीएफटीएल’च्या धर्तीवर करण्याचे नियोजन आहे. साधारणत: पाच वर्षांपूर्वी या बसपोर्टचे भूमिपूजन करण्यात आले. पाच वर्षांनंतर सिडको बस पोर्टची एकही वीट रचण्यात आलेली नाही. सध्या हा प्रकल्प महापालिकेच्या परवानगीसाठी थांबला असल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्या (एसटी) सूत्रांनी दिली.

    तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात सीबीएस येथे बसपोर्ट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बस स्थानके अद्ययावत व्हावीत, यासाठी बसपोर्ट बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुण्यासह राज्यातील विविध भागात बसपोर्ट बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. सीबीएस बस स्थानकात बसपोर्ट होऊ शकत नसल्याने, सिडको बसस्थानक येथे बसपोर्ट तयार करण्याचा निर्णय महामंडळात घेण्यात आला.

    यासाठी निविदा काढण्यात आली होती. साधारणत: दोनशे कोटी रुपये खर्चून बसपोर्ट बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते २८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आले. या बस पोर्टच्या उद्घाटनानंतर हे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून होत असल्याने ते लवकर सुरू होईल, अशी शक्यता होती. मात्र हे काम पाच वर्षांच्या खंडानंतरही सुरू झालेले नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed