• Sat. Sep 21st, 2024
Navi Mumbai Crime: नशेत महिलांच्या डब्यात घुसला, हटकल्याने पोलिसाला मारहाण; लोकलमध्ये रात्री थरारक घटना

नवी मुंबई : दारूच्या नशेत लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या व्यक्तीला दुसऱ्या डब्यात जाण्यास सांगितल्याने या व्यक्तीने डब्यात तैनात असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर घडली.

भालेंद्र लक्ष्मण द्विवेदी (४२) असे या दारुड्या व्यक्तीचे नाव असून, ठाणे रेल्वे पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार पोलीस शिपाई आकाश भारुड हे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सध्या त्यांना लोकलमध्ये सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Mumbai Juhu Chowpatty: मुंबईकरांनो सावधान! जुहू चौपाटीवर जाताय तर काळजी घ्या; कारण…
रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास भारुड हे पनवेल-ठाणे लोकलमध्ये महिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात कर्तव्यावर होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास ही लोकल जुईनगर रेल्वे स्थानकात आल्यानंतर दारूच्या नशेत असलेला द्विवेदी महिलांच्या डब्यात चढला. भारुड यांनी त्याला पुढील स्थानकात उतरून सामान्य डब्यात जाण्यास सांगितले. या गोष्टीचा त्याला राग आल्याने त्याने भारुड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. भारुड यांनी समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने मारहाण सुरूच ठेवली. डब्यातील दोन महिलांनीही द्विवेदी याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांच्याशी देखील असभ्य वर्तन केले.

ही लोकल कोपरखैरणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर बाजूच्या डब्यातील दोन प्रवासी भारुड यांच्या मदतीसाठी आले. मात्र द्विवेदीने त्यांचेही ऐकले नाही. लोकल ठाण्यात पोहोचल्यानंतर भारुड यांनी रेल्वे प्रवाशांच्या मदतीने द्विवेदी याला ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. हा गुन्हा जुईनगर ते कोपरखैरणे रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी द्विवेदी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ठाकरे-शिंदे गटाचे स्वातंत्र्यदिनी सामंजस्य, ठाण्यात स्वतंत्र ध्वजारोहण, वादाची पुनरावृत्ती टाळली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed