तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात सीबीएस येथे बसपोर्ट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बस स्थानके अद्ययावत व्हावीत, यासाठी बसपोर्ट बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुण्यासह राज्यातील विविध भागात बसपोर्ट बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. सीबीएस बस स्थानकात बसपोर्ट होऊ शकत नसल्याने, सिडको बसस्थानक येथे बसपोर्ट तयार करण्याचा निर्णय महामंडळात घेण्यात आला.
यासाठी निविदा काढण्यात आली होती. साधारणत: दोनशे कोटी रुपये खर्चून बसपोर्ट बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते २८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आले. या बस पोर्टच्या उद्घाटनानंतर हे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून होत असल्याने ते लवकर सुरू होईल, अशी शक्यता होती. मात्र हे काम पाच वर्षांच्या खंडानंतरही सुरू झालेले नाही.
३२ हजार चौरस मीटरवर बांधले जाणार बसपोर्ट
सिडको बस स्थानक येथे बांधले जाणारे बस पोर्ट ३२ हजार ८२५ चौरस फुटांत बांधले जाणार आहे. यासाठी ‘विकास’तर्फे संपूर्ण प्रकल्पासाठी खर्च करावा लागेल. या बस पोर्टच्या दर्शनी भागात व्यापारी संकुल बांधले जाणार आहे. त्यामागे म्हणजेच जुन्या आरएम कार्यालयाच्या इमारतीच्या जागी बसस्थानक आणि बस दुरूस्तीसाठी आगार तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकास संपूर्ण प्रकल्प महामंडळाला विनामूल्य हस्तांतरण करणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
सध्या अशी आहे परिस्थिती
सिडको बसपोर्टची इमारत विकासक किंवा कंत्राटदाराकडून तयार करण्यात येणार आहे. यामुळे बांधकाम परवानगीसह सिडकोकडून परवानगी हा विषय कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला आहे. सिडको विभागाकडून नवीन बस पोर्टसाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी अपेक्षीत शुल्कही सिडकोने वसूल केले आहे. आता महानगरपालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज देण्यात आले आहे. बांधकामासाठी महापालिकेकडून विकासशुल्क संबंधित कंत्राटदार भरणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.