देशातील २८ राज्यांतील सर्वात उंच शिखरावर तिरंगा फडकावणे हा ‘हर शिखर तिरंगा’ मोहिमेचा उद्देश आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, शिलांग, आसाम, त्रिपुरा, नागालॅण्ड, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांतील शिखरांवर त्यांनी ध्वज फडकावला आहे. मोहिमेच्या पुढील टप्प्यात ते महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर सर करून तेथे तिरंगा फडकावणार आहेत. त्यासाठी सोमवारी (दि. १४) ते नाशिकला दाखल झाले. येथून मंगळवारी (दि. १५) इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, यानंतर कळसुबाई शिखर सर करण्यासाठी रवाना होतील. मोहिमेच्या पुढील भागात ते गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह दक्षिणेकडील विविध राज्यांना भेटी देत तेथील सर्वोच्च शिखरांवर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात मोहिमेची सांगता होणार असल्याची माहिती सुभेदार रवी देवडकर यांनी दिली.
कोण आहेत कर्नल जामवाल?
कर्नल जामवाल यांना सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आलेले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ॲण्ड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे ते संचालक व प्राचार्य आहेत. चाळीस वर्षांहून अधिक कालावधीचा त्यांचा गिर्यारोहणाचा अनुभव आहे. भारत व आशियाई स्तरावर त्यांनी विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी तीन वेळा एव्हरेस्ट सर केले असून, जगभरातील ७ सर्वोच्च शिखरांवर भारताचा तिरंगा फडकविण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला आहे.
टीममध्ये यांचा समावेश
मोहिमेत कर्नल जामवाल यांच्यासह सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार नेहपाल सिंग, केवल, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगू के, लोबसंग बापू, रूपक छेत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता हे सैनिकही कळसूबाई शिखर सर करणार आहेत.