सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी, पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. याबाबत प्रदेश पातळीवर आणि देशपातळीवर प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिंदे घराण्याचं वर्चस्व होतं. मोदी लाटेत २०१४ पासून शिंदेशाहीला घरघर लागली होती. सुशीलकुमार शिंदें यांनीही वयोमानानुसार राजकारणातून निवृत्त होणार, असे अनेकदा जाहीर केले होते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला मजबूत उमेदवार न मिळाल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेना २०१९च्या लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली.
‘काही पक्ष आणि लोक अडचण निर्माण करण्यासाठी निवडणूक लढवतात’
बसवराज पाटील यांनी विरोधकांवर टीका करत काही पक्ष आणि लोक फक्त अडचण निर्माण करण्यासाठी निवडणुका लढवतात, अशी टीका केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०१९ला काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवत असताना काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल, असे वाटत होते. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने मुस्लिम आणि दलित मतदारांची विभागनी होत भाजपचे डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा विजय झाला होता. २०२४ ला काँग्रेस संपूर्ण ताकदीने आणि विकासाच्या मुद्द्यावर लढेल आणि सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपचा उमेदवार अजूनही ठरला नाही
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या जातीच्या दाखल्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जात पडताळणी समिती समोर याबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. जात पडताळणी समितीने यापूर्वी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराजांचा जातीचा दाखल बनावट असल्याचा निर्णय दिला होता. समितीच्या निर्णयाविरोधात खासदारांनी अपील करत पुन्हा एकदा सुनावणी लावली आहे. जातीच्या दाखल्यामुळे डॉ. जय सिद्धेश्वर महाराज हे अडचणीत आले आहेत. विद्यमान भाजप खासदारांना २०२४ मध्ये उमेदवारी मिळणार की नाही? याबाबत भाजपने अजूनही स्पष्ट केले नाही. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरोधात भाजप कोणता उमेदवार देणार? याकडे लक्ष लागले आहे.