घरकामगार म्हणून काम करणार्या ललिता चौहान यांना अपघातानंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वासोच्छवास आणि उलट्या होत असल्याची तक्रार होती. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्याच्या विनंतीकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. “तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे आम्ही तिला आयसीयूमध्ये नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनवणी करत होतो, पण जागा नाही असे सांगून त्यांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी तिला आयुसीयूत दाखल केले. पण, तरीही आम्ही तिला गमावलं”, पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक म्हणाला.
कळवा रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची आहे. मात्र, आजमितीस साथीचे आजार आणि अतिरिक्त रुग्ण संख्येमुळे ती दीडशे-दोनशेहून अधिक झाली आहे. त्यामुळे वॉर्डमध्ये जिथे जागा मिळेल तिथे बेड लावून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एका वॉर्डमध्ये ४९ रुग्णांची क्षमता असताना सध्या ८९ रुग्णांवर एक परिचारिका उपचार करत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसमोर मनुष्यबळ आणि जागाही कमी पडत आहे. तसेच, रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी डेंग्यू झाल्याने डॉक्टरांची संख्यांही कमी आहे.
कळवा रुग्णालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, पालघर, उल्हासनगर, डोंबिवली, जव्हार, वाडा, भिवंडी अशा विविध भागांतून दररोज ५०० च्या आसपास रुग्ण येत असतात. अनेक खासगी अथवा घरगुती उपचारानंतर अत्यवस्थ झालेले रुग्ण याठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांपुढेही त्यांच्या उपचाराचं आव्हान असते. त्यातच, गुरुवारी दिवसभरात रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवरही याठिकाणी उपचार सुरू आहेत, त्यामुळे रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण असल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र, त्यानंतर गेल्या २४ तासात १८ रुग्णांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मृतांमध्ये ठाण्यातील सहा, कल्याणमधील चार, शहापूर येथील तीन आणि भिवंडी, उल्हासनगर, साकीनाका, गोवंडी येथील प्रत्येकी एक रुग्ण असून, पोलिसांनी दाखल केलेल्या एका अज्ञात रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आहे.