• Sat. Sep 21st, 2024

‘म्हाडा’च्या मुंबईतील ४,०८२ घरांचे भाग्यवान विजेते कोण? ‘या’ लिंकद्वारे पाहा लाईव्ह प्रक्षेपण

‘म्हाडा’च्या मुंबईतील ४,०८२ घरांचे भाग्यवान विजेते कोण? ‘या’ लिंकद्वारे पाहा लाईव्ह प्रक्षेपण

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांची सोमवारी सोडत जाहीर होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून सोडत जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु होईल. म्हाडाने एकूण ४,०८२ घरांसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटाच्या २७९०, अल्प उत्पन्न गटाच्या १०३४, मध्यम उत्पन्न गटाच्या १३९, उच्च उत्पन्न गटाच्या १२० घरांचा समावेश होता. ‘म्हाडा’कडून परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारी घरे ही नेहमीच मुंबईकरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहेत. ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाची यापूर्वीची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. त्यामुळे यावेळी म्हाडाच्या ४,०८२ घरांसाठी मोठ्याप्रमाणात अर्ज आले होते. ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही अर्ज भरला होता. त्यामुळे आज मुंबईतील ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ केला जाईल. या सोडत सोहळ्याला अर्जदारांना उपस्थिती राहता येणार आहे. प्रथम प्राधान्य नियमाने अर्जदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, सोडत सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपणही पाहता येणार आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावरील https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर क्लिक करून हा सोहळा ऑनलाईन पाहता येईल. लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

एक लाख २० हजार १४४ पैकी केवळ ४०८२ अर्जदार या सोडतीत विजेते ठरणार आहेत. अयशस्वी अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (१७ ऑगस्ट) सुरु होईल. या एक लाख २० हजार १४४ अर्जदारांनी एक ते अडीच महिन्यांपासून अनामत रक्कम भरली आहे. अगदी १० हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतची ही रक्कम आहे. नव्या सोडत प्रक्रियेनुसार सोडतीआधीच अर्जदारांची पात्रतानिश्चिती झाली आहे. पहाडी गोरेगाव येथील २ हजार ६८३ आणि ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरांसह अन्य काही घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. या घरांसाठीच्या विजेत्यांना सोडतीनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून देकार पत्रे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४५ दिवसांत किमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास मुदतवाढ देत विजेत्यांना व्याजासह रक्कम भरावी लागेल. मुदतवाढीत रक्कम भरली नाही, तर घर रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोमवारी जे विजेते ठरतील त्यांना पैशांची तातडीने जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed