आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार कुणाल पाटील यांना बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, पाटील यांनी काँग्रेस भवनात दोन्ही लोकसभा क्षेत्रांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार रामहरी रुपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते.
‘मोदी सरकारकडून महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने देशात रोष वाढत आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसकडून संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ स्वबळावर लढावेत, अशी कार्यकर्त्यांची भावना असून, त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील,’ असे कुणाल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक जाहीर केले आहेत. निरीक्षकांची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांकडून राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये आढावा घेण्याचं काम सुरु आहे. त्यानिमित्तानं कुणाल पाटील यांनी शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.
बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. तर दुसरीकडे शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळं कुणाल पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना मांडली असली तरी प्रत्यक्षात काय घडतंय हे लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.