दापोली विधानसभा मतदारसंघात लवकरच राज्यात सत्तेत असलेले शिवसेना भाजप व राष्ट्रवादी हे एकत्र आल्याचे लवकरच पाहायला मिळेल असं मोठे विधान आमदार योगेश कदम यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन जवळ’ बोलताना केलं आहे. त्यामुळे असं मोठे विधान करत आता दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लवकरच सत्तेमधून धोबीपछाड देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे असे स्पष्ट संकेत आमदार योगेश कदम यांनी दिले आहेत.
कोकणात स्थानिक पातळीवरही आता राजकीय बदल झाल्याचे पाहायला मिळणार आहे. राज्यात राष्ट्रवादीचा सत्तेत सहभागी असला तरी राष्ट्रवादीचा दापोली नगरपंचायतीमध्ये मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर सत्तेत सहभागी आहे. पण आता हा विरोधाभास फारकाळ दिसणार नाही. असेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता लवकरच दापोली विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होणार आहे.
आमदार होण्याची इच्छा बाळगून असलेले व काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करून खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय झालेले संदीप राजपुरे यांची नुकतीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतीशील शेतकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. आता लवकरच या निवडीवर कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून अंतिम शिक्कामोर्तब होईल. या निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी मधून कोणाची निवड करायची हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.
राज्यात शिवसेना-भाजप बरोबर आता राष्ट्रवादी ही सत्तेत सहभागी आहे त्यामुळे आता लवकरच शिवसेना भाजप व राष्ट्रवादी या मतदारसंघात एकत्र आल्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि यासाठी एक पाऊल मागे येण्याची माझी नेहमीच तयार असते कारण आमचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे नाहीत त्यामुळे विकासासाठी लवकरच आम्ही एकत्र आल्याचे या मतदारसंघातही चित्र पाहायला मिळेल असे सांगत संदीप राजपुरे यांच्या निवडीचे त्यांनी स्वागत केले आहे.
आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्येही आम्ही तीनही पक्ष एकत्र काम करू आणि हा बदल तुम्हाला लवकरच झाल्याचे पाहायला मिळेल अशी मोठी प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे. त्यामुळे आता दापोली नगरपंचायतीत सत्तेत सहभागी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी वरिष्ठ पातळीवरूनच सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
दीड वर्षांपूर्वी एकत्र निवडणुका लढवून दापोली नगरपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत आले. पण आता राज्यातील समीकरण बदलल्याने त्याचीच अंमलबजावणी दापोली विधानसभा मतदारसंघातही झाल्यास शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.