पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले आहेत?
“शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाने जरी भेट झाल्याचं नाकारलं असलं तरी अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे माध्यमांकडे याचे व्हिडीओ आहेत. जर अशी भेट झाली असेल तर दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी महाराष्ट्रासमोर येऊन हे काय चाललंय, हे सांगणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्या. त्यात विविध नेते मंडळीही उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत”.
“काही जणांनी (भाजप पक्षनेतृत्व) अजित पवारांना १० तारखेच्या सुमारास किंवा कधीतरी मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता. तो शब्द जर पूर्ण झाला नाही, तर त्यांचा पवित्रा काय असणार आहे? यासंदर्भात चर्चा झाल्याचं नाकारता येऊ शकत नाही”, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली. तसेच बाकीही नेते इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. खरतंर राष्ट्रवादी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. या पक्षाचे वरिष्ठ नेते असे भेटतात, त्याला आपण कौटुंबिक भेट कशी म्हणू शकतो?, असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी दोघांपैकी एकाने कुणीतरी समोर येऊन स्पष्ट करायला हवं की या भेटी नेमक्या कशासाठी झाल्या? त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होईल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द?
मुख्यमंत्रिपदाची एकच खुर्ची असताना दोन उपमुख्यमंत्री त्याच्यावर कसा काय डोळा ठेऊ शकतात? असा सवाल करत खऱ्या बातम्या देत चला, अशा शब्दात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आज दुपारीच झापलं. सरकार व्यवस्थित चाललेलं आहे, एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख म्हणून अतिशय व्यवस्थित काम करत आहेत, कुणीही नाराज नाही, असं सांगून अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेतील हवा काढून घेतली होती. पण गेल्या १५ दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. १० ऑगस्टच्या आसपास अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळातल्या दिग्गजांनी बांधली होती. परंतु या शपथविधीची तारीख पुढे ढकलल्याने स्वातंत्र्यदिनाच्या नंतर अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशीही चर्चा आहे.
अजित पवार-जयंत पाटील-शरद पवार यांच्यात सुमारे अडीच तास चर्चा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठक संपावून शरद पवार दुपारी दोनच्या सुमारास उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी आले. त्याचवेळी अजित पवार यांनी आपला शासकीय ताफा पुणे विश्रामगृहात सोडून खासगी गाडीने चोरडिया यांचं घर गाठलं. शरद पवार यांच्या सोबतीला जयंत पाटील होतेच. तिथे अजित पवार पोहोचल्यानंतर उभय नेत्यांमध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. तोपर्यंत या बैठकीची कुणकुण माध्यम प्रतिनिधींना लागली होती. लागलीच शरद पवार येथून बाहेर पडले. त्यानंतरच्या २० मिनिटांत अजित पवार माध्यमांचे कॅमेरे चुकवून अतिशय जलदगतीने गाडीत बसून तिथून निघून गेले. यादरम्यान अजित पवार यांची गाडी तेथील भिंतीला धडकली. पण अजित पवार यांच्या चालकाने गाडी न थांबवता, रिव्हर्स घेऊन तेथून जलद गतीने जाणं पसंत केलं.