पुण्यासह राज्यातील प्रमुख प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर आक्रमण सुरू झाल्याच्या चर्चेतील वादावर अजितदादांनी उत्तर देत पडदा टाकला. ‘मी अर्थमंत्री असल्याने विविध विभागांच्या बैठका घेऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मूर्ख आहोत का,’ असा सवाल करीत ‘मुख्यमंत्र्यांत आणि माझ्यात कोणताही वाद नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वॉर रुम स्थापन केला आहे. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील विविध प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीला राधेशाम मोपलवार सोडून राज्यातील विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता अजित पवार यांनी सुरू असलेल्या वादाबाबत माध्यमांवर संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘मुळात स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टींची माहिती घेत असतात. आम्ही जनतेच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत गेलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पुढे घेऊन जातोय. मी अर्थमंत्री म्हणून बैठक घेऊ शकतो. शेवटचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेत असतात. त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमचे राधेशाम मोपलवार ही होते. तरीही नको त्या बातम्या चालविल्या जात आहेत.
सरकार कोणाचेही असो. शेवटचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही काय मुर्ख आहोत,’ का असा प्रतिसवाल करायला अजित पवार विसरले नाहीत. ‘पत्रकारांनी खऱ्या बातम्या द्याव्यात. ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे,’ असे सांगून ‘आमच्यात असे काहीही नाही’, असे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले.