• Sat. Sep 21st, 2024
दैव बलवत्तर म्हणून…! दोघांना धडक देत गाडी थेट कॅनॉलमध्ये, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

सातारा: खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. १२ रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने वाहनातील सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
बाळूमामांच्या दर्शनाला निघाले होते, कार झाडावर आदळली, ४ जणांचा जागीच करूण अंत
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून डफळपूरला (ता. जत) निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (२५) आणि अविनाश भाग्यवंत उबाळे (२९) हे दोघे लघुशंकेसाठी कॅनॉलजवळ थांबले होते. तेव्हा पाठीमागून आलेली अर्टिगा कार (क्र. एमएच १२ टीवाय १०६६) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने राहुल उबाळे यांना धडक देऊन कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. हा अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (४२), श्रीमंत शिंदे (७०), राजश्री श्रीपती शिंदे (३७), संकेत श्रीपती शिंदे (१३), संस्कृती श्रीपती शिंदे (८, सर्व रा. अथनी, ता. बेळगाव, सध्या रा. पुणे) या पाच जणांना चारचाकीतून बाहेर काढले.

या अपघातामध्ये राहुल उबाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासहित सर्व अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅनॉलमध्ये पडलेले वाहन वाहून जाताना पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने पुढील दुर्घटना टळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी असणाऱ्या भोर तालुक्यातील प्रसाद पांडुरंग गोळे आणि अजय कांबळे यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन वाहनासोबत बुडत असलेल्या व्यक्तींना वाचवण्यात सहकार्य केले. ग्रामस्थांच्या धाडसामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दोन महिन्यांपासून नाशिक ग्रामीण भागात पाऊस नाही, पिके करपू लागल्याने शेतकऱ्याने फिरवला रोटर!

सलग सुट्यांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर आज (शनिवार) सातारा दिशेने पुण्याहून येणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती. त्यामुळे या महामार्गावर वाहनधारकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. या अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव, पोलीस हवालदार विजय पिसाळ, चालक दत्तात्रय धायगुडे, पोलीस नाईक अतुल आवळे, पोलीस हवालदार पंडित, पोलीस नाईक सचिन शेलार, पोलीस हवालदार उद्धव शिंदे आणि कर्मचारी, हायवे पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या अपघाताचा तपास खंडाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed