आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले आहे. पारोळा तालुक्यातील गावातील १४ वर्षीय मुलगी आई तसेच भावासह वास्तव्यास आहेत. एका शेतातील पत्र्याच्या खोलीत सर्व कुटुंब राहत असून मजुरी करत उदरनिर्वाह भागवतं. दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सायंकाळी ती राहत असलेल्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यादरम्यान बारकु मंगा भिल याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या अत्याचारास मुलीने विरोध केला असता बारकु याने पिडीत मुलीच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतरही दोरीने तिचा गळा आवळला.
या घटनेने मुलीची काही वेळासाठी शुध्द हरपली आणि बेशुद्ध पडली. शुद्ध आल्यानंतर अल्पवयीन मुलगी रक्ताबंबाळ अवस्थेत घरी आल्यानंतर तिने प्रकाराबाबत कुटुंबियांना हकीकत सांगितली. कुटुंबियांनी तातडीने अल्पवयीन मुलीला सुरुवातीला पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीला धुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी मुलीवर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्याविरुध्द अत्याचारासह प्राणघातक हल्ला अशा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बारक्याला भिल याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अटक केली आहे.
घटनेनंतर संतप्त पीडित मुलीच्या कुटुंबियासह समाजबांधवांसह ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर समाज बांधवानी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करुन आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाणे गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर हल्ल्याची घटना कळताच माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशउपाध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः पोलीस स्टेशनला भेटून परिस्थिती समजून घेतली. अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी नदळवाडकर यांच्याशी संपर्क करून गुन्हेगाराला कडक कारवाई करण्यात यावी कठोर कारवाईची मागणी केली.
फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्ह्याची नोंद करा. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून सूचना केल्या. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी डॉ. सतीश पाटील यांनी स्वतः फोनवरून पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करणार आहेत. यावेळी डॉ. सतीश पाटील यांनी पीडित मुलीच्या आईचे सांत्वन करून गावातील लोक अनुभवीत महिला होत्या त्या जमावाला शांत केले. घटनेतील अपराधीवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत शासनाकडे कळविण्यात आले असून त्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एरंडोल आणि भडगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पारोळा तालुक्यातील या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे.