• Sat. Sep 21st, 2024

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे बिगुल वाजले; सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे बिगुल वाजले; सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होणार मतदान

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदा या निवडणुकीत युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आमनेसामने दिसणार आहेत.

मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी ९४ हजार ६३१ मतदारांची अंतिम यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रमही बुधवारी जाहीर केला. त्यानुसार उमेदवारांना १८ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच, १० सप्टेंबरला मतदान होऊन १३ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर आता सर्वच विद्यार्थी संघटनांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. त्यामुळे युवा सेनेतील पदाधिकारीही विभागले गेले आहेत. त्यातच मनविसे, अभाविप यांनीही यंदा जोरदार तयारी केली आहे. मनविसे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार आहे. अमित यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व १० जागा जिंकून राज ठाकरे यांना विद्यार्थी सेनेकडून भेट देणार असल्याचे नुकतेच त्यांनी मनविसेच्या एका कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यातून मनविसे आक्रमकपणे या निवडणुकीत उतरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे युवा सेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेसमोर या निवडणुकीत मागील निवडणुकीतील विजय कायम राखण्याचे आव्हान असेल.

२०१७च्या सिनेट निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे ७० हजार मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा ९४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. यंदा मतदारांची नोंदणी वाढल्याने चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेनं राजकीय वातावरण तापलं, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया!

असा आहे निवडणूक कार्यक्रम

– उमेदवारांना १८ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार
– उमेदवारी अर्ज २५ ऑगस्टपर्यंत माघारी घेता येणार
– निवडणुकीसाठी १० सप्टेंबरला मतदान
– मतमोजणी १३ सप्टेंबरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed