यामध्ये बच्चू कडू यांनी शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे म. ग्रा. रो. ह. यो. अंतर्गत करण्यात यावी, नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत ५० हजार रुपये जाहीर केले होते. परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. तो तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली.
बच्चू कडू यांनी अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरीत देण्यात यावी, वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि होणारी जीवितहानी यासाठी भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, कुळा मातीचे, अतिक्रमन करून वास्तव्य करणारे, पालघर (ताडपत्री) मध्ये निवास करणारे, घरेलू कामगार व बेघरांना घरकुल देण्यासाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्यात यावी,बांधकाम मजूरा प्रमाणे शेतकरी व भूमीहीन शेतमजूर व घरेलू कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, असं देखील बच्चू कडू म्हणाले.
प्रकल्पग्रस्तांना २५ लक्ष अनुदान, २० लक्ष बिनव्याजी कर्ज किंवा कुटुंबातील १ सदस्याला नोकरी देण्यात यावी. कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पूर्व कल्पना दिल्या शिवाय कामावरून कमी करण्यात येऊ अशा विविध धोरणात्मक मागण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करत असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
या संदर्भात शिंदे फडणवीस सरकार या धोरणात्मक मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या म्हणून आपण रस्त्यावर उतरले का ? या प्रश्नाचे उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की, या सगळ्या मागण्या ७५ वर्षांपासून आहेत. आम्ही यासंदर्भात या मोर्चाची व्याप्ती वाढवणार आहोत.भविष्यात एक विशाल मोर्चाचे आयोजन करणार आहोत, असं म्हणत त्यांनी मुख्य प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
बच्चू कडू यांच्या या भूमिकेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन बापू देशमुख यांनी सुद्धा स्वागत केल्याने राजकीय तर्कवितर्क व्यक्त केल्या जात आहे.