• Tue. Nov 26th, 2024

    मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Aug 9, 2023
    मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. ९ : मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले.

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपसचिव कि.म. जकाते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम.पी.काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमारांचे चांगले प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा, उत्तम मार्केटिंग सहाय्य यांची जोड मिळाल्यास मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम उद्योग म्हणून जिल्ह्यात विकसित होऊ शकतो. यासंदर्भातील सादरीकरण आजच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर करण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास आराखडा वेगाने तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

    याबरोबरच आदिवासी विकास योजना आणि शहर परिवहन सेवेचा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.

    आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

    आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसाय करता यावा म्हणून जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात म्हशी व गायी वाटप योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

    दुग्ध व्यवसायाबाबत तज्ज्ञांकडून आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारा उपलब्धता, दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पशू चिकित्सा यंत्रणा अधिक सक्षम करणे, पशू चिकित्सा यंत्रणेतील पदे भरणे, शेण आणि गोमूत्रापासून सहउत्पादने घेणाऱ्या संस्था व कंपन्यांसोबत बोलणी करून आदिवासींना उत्पन्नाचे अधिकचे स्त्रोत उपलब्ध करुन देणे, पतपुरवठ्याकरता बँकासोबत बैठका घेणे, याबाबत वेळेवर कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या.

    चंद्रपूरात लवकरच शहर परिवहन बससेवा

    चंद्रपूर येथे अत्याधुनिक विद्युत बसेसच्या माध्यमातून लवकरच शहर परिवहन बससेवा सुरू करणार येणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. या शहर बससेवेमुळे चंद्रपूर शहरातील सामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर सार्वजनिक वाहतूक हाच उत्तम तोडगा आहे. राज्यातील सर्वोत्तम शहर परिवहन बससेवा चंद्रपूरात निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही कररावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला ‍दिले.

    शहर बस सेवेसंदर्भातील सादरीकरण यावेळी त्यांच्यासमोर करण्यात आले.

    000

    दीपक चव्हाण/विसंअ/

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed