मुंबई, दि. ९ : “रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून निधीची तरतूद करता येईल,” असे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज सांगितले.
यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. बैठकीला राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. बामणे, मध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक श्री. चवरे, विभाग नियंत्रक दिपक गोडे आदी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे पुढे म्हणाल्या की, गोवा महामार्गावर पेणजवळ एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी जागा दिलेल्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे पेणजवळील अशा हॉटेल्सवर एसटी डेपोनिहाय गाड्यांचे नियोजन करावे. जेणकरून हॉटेल व्यावसायिकांना उत्पन्न मिळून महामंडळालासुद्धा उत्पन्न येईल. त्यानुसार एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००
निलेश तायडे/विसंअ/