मुंबई : राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. सरकारने महामंडळाला ३३४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिल्याने आज, बुधवारी पगार होण्याची शक्यता आहे, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून जूनच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तिपोटी निधी एसटी महामंडळाला देण्यास मान्यता मिळाली असून, तो महामंडळाच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पगाराची ७ तारीख चुकली असली तरी १० तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा केला जाईल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला.

एसटी महामंडळाच्या बससेवेत २४ विविध सामाजिक घटकांना प्रवाससवलत देण्याची राज्य सरकारची योजना आहे. राज्यातील ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवास सवलत आहे, तर सर्व महिलांना विविध प्रकारच्या एसटी सेवेतील भाडेदरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते १०पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी साध्या बससेवेत १०० टक्के सवलत आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे.
विविध प्रकारच्या बससेवा सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तिपोटी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी राज्य सरकारकडे ३३४ कोटी ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागीणी केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.