जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होती.या बैठकीला आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्या आधी अडवून धरलं. यावेळी अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हा नियोजन समितीतून कामे मंजूर होत नाहीत,आम्हाला डावललं जात असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आणि पंडित भुतेकर यांनी केला.यावेळी संतप्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजप केवळ शिवसेनेमुळे सत्तेत आहे अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.याच घोषणाबाजीत पालकमंत्री अतुल सवे आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
हा गोंधळ चालू असताना पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणल्यावर तिथे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी धाव घेतली आणि घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर झाला प्रकार सांगत पालकमंत्री हे कामात दूजाभाव करत असल्याचे सांगितले.
अर्जुन खोतकर काय म्हणाले?
अर्जुन खोतकर यांनी यानंतर बोलताना जी सभ्यतेची भाषा असते मंत्री म्हणून ती पालकमंत्र्यांनी ओलांडली, त्यामुळे शिवसेनेकडून जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी हा प्रकार घडला, असे खोतकर म्हणाले.पालकमंत्री सतत अपमान करत असल्याची आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. पालकमंत्री अतुल सावे हे कामात दुजाभाव करतात हे सत्य आहे मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
अतुल सावे काय म्हणाले?
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांना कामे मागितली पाहिजेत. त्यांना मी कामे दिली,त्यांना मिळाली नसतील तर त्यात माझा काय दोष, असा सवाल अतुल सावे यांनी केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला मी जबाबदार नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं वाटेकरी वाढले आहेत अशी प्रतिक्रिया जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीवर आणि आज झालेल्या राड्यावर अतुल सावे यांनी दिली.