• Mon. Nov 25th, 2024
    Video : निधी वाटपावरून वाद, भुमरे-सत्तारांना अंबादास दानवे एकटेच भिडले!

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आमदार राजपूत आणि अंबादास दानवे सत्तार-भुमरे जोडगोळीवर तुटून पडले.

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेमकं काय झालं?

    छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार असे संकेत होते. अगदी तशीच वादळी बैठक झाली. निधीवाटपावरून जसा अधिवेशनात गदारोळ झाला तसाच गदारोळ नियोजन समितीच्या बैठकीतही झाला.

    ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याची तक्रार केली. यावरून भडकलेल्या पालकमंत्री भुमरेंनी आणि अब्दुल सत्तारांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनवायला सुरूवात केली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी रौद्ररूप धारण करत आपल्या खुर्चीवरून उठून भुमरे-सत्तारांवर तुटून पडले. उभय नेत्यांमधला हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत गेला.

    मतदारसंघामध्ये निधी मिळेना, अंबादास दानवे अन् संदीपान भुमरेंमध्ये वाद

    या वादावर आमदार शिरसाट काय म्हणाले?

    “ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्याला लेखी कळवण्यात येईल असं म्हटलं. मात्र, त्यानंतरही आमदार राजपूत यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालकमंत्री यांनी त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. त्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली”

    कुठे झुकतं माप तर कुठे डावलल्याचा आरोप!

    महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी निधी दिला नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंच्या सहकारी आमदारांनी बंड केलं. आता त्याच अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना झुकतं माप दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र अजित पवार यांनी निधी देताना आम्हाला डावलल्याचा आरोप केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed