• Sat. Sep 21st, 2024

Mumbai: बेस्टचे कंत्राटी कर्मचारी मागण्यांवर ठाम, संपाचा सहावा दिवस, मुंबईतील प्रवाशांचे हाल

Mumbai: बेस्टचे कंत्राटी कर्मचारी मागण्यांवर ठाम, संपाचा सहावा दिवस, मुंबईतील प्रवाशांचे हाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारचा मेगा ब्लॉक त्यात बेस्टच्या कंत्राटी चालकांचा संप. यामुळे सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांचे हाल कायम होते. भाडेतत्त्वावरील १,६७१ बसपैकी ७०४ बस आगारातच उभ्या असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी चालक व वाहकांना भाडेतत्त्वावरील बसेस चालवण्यास देण्यात आल्या. मात्र, मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेस्टतर्फे मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार, अशी भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतल्याने आज, सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही मुंबईची कोंडी होणार आहे.

पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने कंत्राटींनी संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

कंत्राटी कामगारांबरोबर बेस्टचा संबंध नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून शनिवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले ते चुकीचे आहे. आमच्या मागण्या रास्त असून कायद्याने त्याची पूर्तता करणे अपेक्षित आहे. अद्याप तरी राज्य सरकार व बेस्ट उपक्रमाकडून बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

दरम्यान, आज, सोमवारी बेस्ट भवनात बस कंपन्या, कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी व बेस्ट उपक्रम यांच्यात बैठक होण्याची शक्यता असून दुपारपर्यंत काही तोडगा निघेल, असे सांगण्यात येते आहे.

बेस्टच्या कंत्राटी चालकांनी पुन्हा उपसलं आंदोलनाचं हत्यार; मुंबईतील प्रवाशांना मोठा फटका

मालवणी आगाराबाहेर पोलिस बंदोबस्त

कंत्राटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणल्या आहेत. उपक्रमातील कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मालवणी येथे झालेल्या प्रकारानंतर बेस्टकडून पोलिस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार करण्यात आली. मालवणी पोलिस ठाण्यातर्फे मालवणी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन पोलिस गाड्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर मालवणी आगारातील बस गाड्या प्रवर्तित करतेवेळी कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

एसटीच्या १५० गाड्या सेवेत

कंत्राटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून १५० गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. शुक्रवार संध्याकाळपासून त्या प्रवासी सेवेत चालवण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांचेही हाल

शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीही बेस्टच्या बस दिल्या जातात. मात्र, शुक्रवारपासून कंत्राटी चालकांचा संप सुरू झाल्याने शाळांना दिल्या जाणाऱ्या बस अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांना कामाला दांडी मारून मुलांना शाळेत सोडावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed