• Sun. Sep 22nd, 2024
आई-वडील ऊसतोड मजूर; लेकीनं रोवला अटकेपार झेंडा, जर्मनीत ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे करणार नेतृत्व

सातारा: जिल्ह्यामधील माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर या उभयंतांच्या पोटी जन्मलेल्या काजल हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.
दुष्काळी भागातील ऊसतोड कामगाराच्या मुलीची उत्तुंग भरारी, अधिकारी बनली अन् आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं
मिळालेल्या माहितीनुसार, काजल सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या भारतीय हॉकी संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाली आहे. तिने याआधीही भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने डब्लीन येथे गतवर्षी झालेल्या ५ देशांच्या २३ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आणि गतवर्षीच १९ ते २८ जूनदरम्यान झालेल्या आयलंड येथील हॉकी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आयलंड येथील स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून देण्यात तिने निर्णायक भूमिका बजावली आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात झारखंड येथील सिमडेगा येथे झालेल्या ११ व्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. या स्पर्धेतील कामगिरीमुळे राज्य शासनातर्फे तिला ५० हजारांचे बक्षीसही मिळाले होते.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून तिला छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक इम्रान शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू आहे. सातारा जिल्ह्याला माण तालुक्यातील कन्या म्हणून विशेष अभिमानही आहे. आपल्या मातीतसुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवण्याची ताकद आहे. हे आज तिने जगाला दाखवून दिले आहे. काजलचे आई-वडील आजही ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे दि. १८ ते २३ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी ती जाणार आहे.

मुली मेट्रो चालवतात हे पाहून लोकांना कौतुक वाटतं; पुणे मेट्रोमध्ये नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी

आई-वडिलांबरोबर ऊसतोडीस जाणाऱ्या काजलला शिक्षणात खंड पडू नये म्हणून दुसरीपासून वर्गशिक्षिका आणि सध्या शिक्षण विस्ताराधिकारी संगीता चंद्रकांत जाधव यांनी घरी आणले होते. आमच्या सहवासात आल्याने मी सहा महिने तिचा कसून सराव घेतला. तिसरीतून राज्यस्तरावरील क्रीडा प्रबोधिनीची यशस्वी चाचणी पार पाडत तिने चौथीत महाराष्ट्र शासन क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे प्रवेश मिळविला, अशी माहिती क्रीडा समन्वयक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed