उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती.
अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने अजितदादांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
अधिवेशाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून
जवळपास अडीच आठवडे चाललेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबर, २०२३ पासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
१७ जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संस्थगित करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात एकूण १३ दिवस कामकाज चालले. त्यात १०९ तास २१ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास २४ मिनिटे झाले. वाया गेलेला वेळ हा फक्त २० मिनिटांचाच आहे. अधिवेशनात सभागृह तहकूब करण्याची वेळ जवळपास आलीच नाही.