- दत्तक पित्याकडून अपेक्षापूर्ती कधी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस महिनाभराच्या अंतराने नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर झालेले निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कसह विविध प्रकल्प नेमके कधी सुरू होतील, असा प्रश्न दत्तक नाशिककरांकडून उपस्थित केलेाजात आहे.
फडणवीस हे शुक्रवारी रात्री नाशिक दौऱ्यावर आले असून, आज, शनिवारी (दि. ५) त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमीत दीक्षांत समारंभ होणार आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना नाशिकला निओ मेट्रोची घोषणा फडणवीस यांनी केली होती. यासोबतच नाशिकच्या पाणीपुरवठा योजनेसाठी साडेतीनशे कोटी रुपयांसह गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी निधीची घोषणा केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही आश्वासने फाइलबंद झाली होती. परंतु, शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष लोटले, तरी नाशिकच्या विकासाचा वनवास मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर झालेले निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कसह पाणीपुरवठ्याचे प्रकल्प अद्यापही कागदावरच असल्याचे चित्र आहे.
फडणवीसांकडून या आहेत अपेक्षा…
-सिंहस्थासाठी निधीचे व्हावे नियोजन
-नाशिक निओ मेट्रो प्रकल्पास मिळावी चालना
-आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कला लाभावी गती
-नमामी गोदासाठी १८०० कोटींचा प्रकल्प लागावा मार्गी
-द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुलाचे त्रांगडे मिटवावे
-नाशिकचा मध्य व बाह्य रिंगरोड मार्गी लावावा
-‘एसटीपी’साठी चारशे कोटींचा आराखडा पूर्णत्वास न्यावा
-पाणीपुरवठा योजनेचा ३५० कोटींचा प्रलंबित आराखडा मंजूर करावा
-नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचे भूसंपादन त्वरेने करावे
-साधुग्राम येथे प्रगती मैदानच्या धर्तीवर विकासाला चालना द्यावी
-फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाला प्राधान्यक्रम दिला जावा
- खड्ड्यांचा ताप मिटणार
नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसह खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १०४ कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीवर सादर झाले आहेत. त्यामुळे नाशिककरांचा खड्ड्यांचा ताप लवकरच मिटणार आहे.
महापालिकेला नियमित प्रशासक नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रस्ताव बांधकाम विभागात पडून होते. नूतन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी या प्रस्तावांना हिरवा कंदील दर्शविल्यानंतर ठेकेदारांना कार्यारंभ देण्याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीवर आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची खड्ड्यांतून सुटका होणार आहे. पावसाळा आला, की नाशिकमधील रस्त्यांचे पितळ उघडे पडते. गेल्या तीन वर्षांत नाशिकच्या रस्त्यांवर तब्बल सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, तरीही पावसाळा आला, की खड्ड्यांचे प्रमाण वाढते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर कमी असल्याने तुलनेत रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या काहीशी कमी असली, तरी गणेशोत्सव व नवरात्रीसारख्या सणांमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने वेळोवेळी शहरातील खड्ड्यांची स्थिती नाशिककरांसमोर मांडली. महापालिकेला नियमित प्रशासक नसल्यामुळे बांधकाम विभागानेदेखील दुरुस्तीचे प्रस्ताव फाइलबंद केले होते. परंतु, जोरदार पावसामुळे रस्ते उखडण्याचे प्रकार लक्षात घेत आयुक्त करंजकर यांनी तीन महिन्यांपासून फायलींच्या प्रवासात अडकलेल्या १०४ कोटी ३३ लाख रुपयांच्या खड्डे दुरुस्तीच्या कंत्राटाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने आता स्थायी समितीसमोर विभागनिहाय रस्ते दुरुस्तीसाठी निश्चित केलेल्या ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रस्ताव ठेवले आहेत. त्यामुळे लवकरच नाशिककरांची खड्ड्यांतून सुटका होणार आहे.
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाḤला (एफडीए) मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पथकाने परराज्यातून येणारा डेलिशिअस स्वीट्स (स्वीट मावा) व सुट्टे खाद्यतेल जप्त केले आहे.
- एफडीएचे धाडसत्र; भेसळयुक्त पदार्थ जप्त
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पथकाने परराज्यातून येणारा डेलिशिअस स्वीट्स (स्वीट मावा) व सुट्टे खाद्यतेल जप्त केले आहे.
पहिली कारवाई २८ जुलै रोजी कळवण येथे करण्यात आली. दुसरी कारवाई नाशिक शहरातील द्वारका परिसरात करण्यात आली. शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणाऱ्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी, मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्याकरिता करीत असतात. त्यानुसार बुधवारी (२ ऑगस्ट) द्वारका येथील वीर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस येथे पाळत ठेवून एका खासगी प्रवासी बसमधून गुजरात येथून मागविलेला डेलिशिअस स्वीट्स व हलवा जप्त केला आहे. उपनगर येथील यशराज डेअरी अॅण्ड स्वीट्स व सिन्नर येथील शांताराम बिन्नर यांनी हा हलवा मागविला होता. २२ हजार ३०० रुपये किमतीचा १३० किलो साठा जप्त केला आहे.
तिसरी कारवाई गुरुवारी (३ ऑगस्ट) मालेगाव येथील मेडिकलवर करण्यात आली. मामलेदार लेन, सोमवार वॉर्ड या ठिकाणी असलेल्या मे सैफी मेडिकल एजन्सीज, या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेल्या २४ हजार ९४० रुपये किमतीच्या १७५ न्युट्राक्यूटिकल बॉटल्स लेबलदोषयुक्त आढळल्याने जप्त केल्या आहेत. या कारवाया सह आयुक्त, संजय नारागुडे व सहायक आयुक्त (अन्न), विवेक पाटील, मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा महाजन, प्रमोद पाटील, योगेश देशमुख यांनी केल्या आहेत.