प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेकांना प्रत्यक्षात दर्शनासाठी येणे शक्य होत नाही अशा भाविकांना न्यासाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळ आणि सिद्धिविनायक ॲपवरून ऑनलाइन दर्शन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. १ ऑगस्ट रोजी सिद्धिविनायक न्यासाच्या पदाधिकाऱ्यांकडे एक लिंक आली. ही लिंक उघडल्यावर ‘उत्सव’ नावाच्या ॲपवर सिद्धिविनायक गणपतीचा फोटो दिसला. त्यावर देणगी, ऑनलाइन पूजा तसेच इतर पर्याय उपलब्ध होते.
यावर न्यासाच्या माध्यमातून चौकशी सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी काही भाविक प्रसाद मागणीसाठी मंदिरात आले. त्यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘उत्सव’ ॲपवरून ऑनलाइन दर्शन आणि पूजा केली असून प्रसाद मंदिरात मिळेल असे सांगितले. यासाठी पैसेही ऑनलाइन पाठविल्याचे हे भाविक म्हणाले. ही भाविकांची फसवणूक असल्याने या प्रकाराची गंभीर दखल न्यासाने घेतली.
अधिकृत संकेतस्थळ पहावे…
सिद्धिविनायक न्यासाच्या पर्यवेक्षकांनी ‘उत्सव’ ॲपबाबतची माहिती पोलिसांना दिली. न्यासाबरोबरच भाविकांचीदेखील ही फसवणूक असल्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून दादर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीच्या कलमांतर्गत ‘उत्सव’ ॲप चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपचा वापर करावा, असे आवाहन न्यासाने केले आहे.