चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या जीवती तालुक्यातील रायपूर (खडकी) हे आदिम कोलाम समुदायचे गाव. गावाची ग्रामपंचायत तीन किमी लांब. गावाची लोकसंख्या जेमतेम १५० आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटली मात्र गावाच्या चेहरा भक्कास अन उजाडच. पेसा क्षेत्रातील गट ग्रामपंचायत खडकी (रायपुर) अंतर्गत रायपुर गावाचा समावेश आहे. गावात समस्यांची गर्दी झालेली आहे. इथे खरी समस्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची आहे. पाणी आणण्यासाठी गावकरी दीड कि.मी डोंगरात उतरून नाल्याचे पाणी आणतात. ग्रामपंचायतने डोंगराखाली नाल्यात असलेल्या विहिरीवर दोन वर्षापूर्वी सोलर बसवले होते. सोलरमुळे गावात पिण्याचे पाणी येते. मात्र जिथून हे पाणी येते त्या विहिरीतील पाण्यात अळ्या पडल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून या विहिरीत निर्जंतुकीकरणासाठी साधे ब्लिचिंग पावडरही टाकण्यात आलेले नाही. ही विहीर तुटलेल्या अवस्थेत आहे. विहिरीला कटगर नाही. सध्या या विहिरीत आंब्याचे झाड पडलेले आहे. पावसात सोलर चालत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी डोंगर चढ-उतार करावे लागते. रायपुर (खडकी) हे आदिम कोलाम समुदायाचे गाव आहे. या गावात एकही उच्चशिक्षित नाही. गावातील शाळा बंद आहे. अंगणवाडी आहे पण स्वतंत्र इमारत नाही. लाईट आहे पण फार राहत नाही. नक्षलग्रस्त भागात हा परिसर असल्याने मागच्या वर्षी सार्वजनिक सोलर वनविभागाने दिला. त्यावर केवळ रात्री गावात थोडाफार उजेड राहावा म्हणून बल्बचा वापर होतो. साधे मोबाईलची चार्जिंग करायला तालुक्याच्या ठिकाणी किंवा नगराळा जावे लागते. गावात पावसाचे पाणी साचलेले असते. मुलभूत सोई-सुविधापासून गाव वंचित आहे.