सिंधुदुर्गातून कोल्हापूरला दररोज ओव्हर लोड वाहतूक होत असते. अनेक सिलिका वाळू (मायनिंग) गाड्या याच घाटातून नेहमी जात असतात, तसेच या घाट मार्गावरून प्रवाशी वाहतूक त्याचप्रमाणे मोटरसायकल, चार चाकी वाहनांची वर्दळ कायम असते. पश्चिम महाराष्ट्रातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक नेहमी होत असते. प्रामुख्याने या करूळ घाटातून गोव्याला सुद्धा ये-जा वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र घाटाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. करूळ घाटात दरडी, माती कोसळण्याचे प्रमाण वाढू लागल आहे. घाट हळूहळू जीर्ण होत चालला आहे. घाटातून वाहतूक करणे वाहन चालकांना जिकरीच बनत चालले आहे. त्यामुळे मोठी घाटात दुर्घटना घडण्याआधी शासनाने दखल घेण्याची गरज आहे.
करूळ घाटात अनेक वर्षांपासून दरडी कोसळतात, या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र कोणत्याही ठोस उपाय योजना केल्या जात नाही. प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी करून वाहन चालकांचे समाधान केले जाते. कालांतराने पुन्हा आहे तिच परिस्थिती निर्माण होते. राजकीय पक्षाचे नेते मंडळी येतात पाहणी करतात आणि आश्वासने देतात निघून जातात.
घाट रस्त्याला साईट पट्टी शिल्लक राहिलेली नाही. पावसाचे पाणी जाण्यासाठी साईटची गटार सुस्थितीत नाहीत. संरक्षण साईट रेलिंग तसेच संरक्षण भिंती तुटलेल्या स्थितीत आहेत. या घाटात नेहमी छोटी- मोठी दरड-माती कोसळत असते. दरड कोसळली की वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. वाहन चालकांना आपली वाहने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे हा करूळ घाट कधी सुस्थितीत बनवणार असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.
एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री सांगतायत की २४९ कोटीचा निधी करूळ घाटासाठी मंजूर केले आहे. परंतु तो निधी अजूनही कागदांवर राहिला आहे. प्रत्यक्षात अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. हा घाट मार्ग सिमेंट कॉग्रेटचा बनवला जाणार आहे, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी केली होती.