देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती… देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणार आहेत. अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच त्यांच्या “मन की बात” प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. माहिती आणि प्रसारण तसेच दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांनी नवी दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना अपूर्व चंद्रा म्हणाले की, ‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे “मेरी माटी मेरा देश” या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले. मेरी माटी मेरा देश या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वर्षीही हर घर तिरंगा अभियान आयोजित केले जाईल या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात माध्यमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.
सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी आपल्या सादरीकरणात माहिती देताना सांगितले की या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील. वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात २ लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग नोंदवला आहे, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली.
९ ते ३० ऑगस्ट, २०२३ दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतिक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, असे या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना सांस्कृतिक सचिवांनी सांगितले. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकतात. या देशव्यापी मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन यांनी दिली. पोर्टलवर ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती असून, तरूण या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रमही अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी होऊ शकतात. युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मीता राजीवलोचन यांनी केले. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या प्रसारमाध्यमांवरच्या प्रसारणाची माहिती दिली. ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० ऑगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ,नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.