माजी आमदार ज्योती कलानी यांचे माजी स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी आपल्या पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करत आपल्या आत्महत्येस कोण कोण जबाबदार आहेत, त्यांची नावे देखील या व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितली आहेत. तसेच आपण आत्महत्या का करत आहोत या संबंधित सर्व पुरावे आपण घरात काढून ठेवले असल्याचे देखील ननावरे यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले होते.
यामुळे घराचा पंचनामा करण्यापूर्वी ननावरे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. मात्र तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी दुपारच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी ननावरे यांच्या बंगल्याजवळ येत त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक जागरूक नागरिकांनी याबाबत हस्तक्षेप करत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही इसम घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हे दोन्ही इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
सदर दोन्ही इसम हे घटनास्थळी का आले असावे? त्यांचा हेतू काय होता? पुरावे नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला का? तैनात करण्यात आलेले पोलीस त्याच वेळी कुठे गेले होते? असे अनेक प्रश्न या घटनेने उपास्थित झाले आहेत.