• Fri. Nov 15th, 2024

    मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2023
    मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

     महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी

    मुंबई, दि. ३ : “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते.

     कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला 

    राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी  घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed