भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष काल मंगळवारी काही कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये आले होते. मात्र, त्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी जुन्या भांडणाच्या रागातून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये दोन गोळ्या त्यांना लागल्या. जिल्हा परिषदेमध्ये कशाचा आवाज झाला हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी बाहेर आले असतात पप्पू चव्हाण यांच्या ओळखीचे दीपक हिरास यांनी त्यांना ओळखले आणि उपचारासाठी हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तीन राऊंड गोळ्या फायर केल्या त्यातील दोन गोळ्या पप्पू चव्हाण यांना लागल्या. दोन गोळ्या लागल्यामुळे पप्पू चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर हिंगोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. इतर तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक विकास पाटील घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी दोन काडतूस आढळून आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.