उद्धव ठाकरेंना वाटते, पवारांनी कार्यक्रम टाळावा
टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघे मंगळवारी एकाच मंचावर येणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे चांगलेच खटकत असल्याचे समजते. शरद पवार यांनी सोहळ्याला हजेरी लावता कामा नये अशी त्यांची इच्छा असून तसा निरोप त्यांनी पवारांपर्यंत पोहोचवल्याचे खात्रीलायकरित्या समजते. पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये अशी उघड भूमिका ठाकरे यांच्या पक्षाने घेतली आहे. मोदी आणि पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले की, त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होणार आणि त्याचा फटका आघाडीला बसणार, असे उद्धव ठाकरे यांना वाटते. साहजिकच पवारांनी हा कार्यक्रम टाळावा, असे त्यांचे म्हणणे असल्याचे कळते.
… तर शरद पवारांना आघाडीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही
‘वास्तविक पाहता ‘इंडिया’ ही आघाडी ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ या एकाच मुद्द्यावर झालेली असताना मोदींच्याच सत्काराला जर पवार जात असतील, तर त्यांना या आघाडीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही’, असे काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री व सध्या आमदार असलेल्या नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
काँग्रेस पक्षाने फार नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही
दुसऱ्या बाजूला, ‘काँग्रेस पक्षाने फार नाकाने कांदे सोलण्याची गरज नसून या कार्यक्रम पत्रिकेत माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव आहे. तसेच या संस्थेचे मुख्य पदाधिकारी रोहित टिळक हेदेखील अधिकृतरित्या अजूनतरी काँग्रेस पक्षातच आहेत. त्यामुळे पुरस्कार देणारी संस्थाच मुळात काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने पवारांनी या कार्यक्रमाला जावे किंवा जावू नये हे सांगण्याचा काँग्रेस पक्षाला कोणताही नैतिक अधिकार नाही,’ असे एका पवारसमर्थक आमदाराने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार विरोधकांच्या आघाडीला सुरूंग लावणार?
शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे याही अजित पवार यांच्या बंडानंतर जितक्या आक्रमक होत्या, तितक्या आक्रमक दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया या केंद्रात मंत्री होणार असल्याचे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज छातीठोकपणे सांगत असतात. मात्र, याला कोणताही दुजोरा भाजप वा स्वतः सुप्रिया अथवा शरद पवार यांच्याकडून मिळू शकलेला नाही. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विरोधकांच्या आघाडीला सुरूंग लावणार की, आपली भूमिका शेवटपर्यंत अनपेक्षित ठेवण्याची परंपरा कायम ठेवून कार्यक्रमापासून दूर राहणार याचीच सध्या चर्चा सुरू आहे.