चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. चंद्रपूरच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिशादर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक व्रतस्थ शिक्षक आणि साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय मार्गदर्शक गमावल्याची शोकसंवेदना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला चंद्रपूरचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एक उत्तम अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विविध संस्थांचे आधारस्तंभ म्हणून त्यांचा नावलौकीक होता. 2012 मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात अखिल भारतातील मराठी साहित्यिकांनी एक उत्तम असे संमेलन अनुभवले.
त्यांच्या निधनामुळे चंद्रपूरच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
००००००