• Sat. Sep 21st, 2024
थोडा आराम कर! सीनियरनं कॉन्स्टेबलला सांगितलं, पण..; धावत्या ट्रेनमध्ये गोळीबाराआधी काय घडलं?

मुंबई: जयपूरहून मुंबईला येत असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे साडे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. त्यात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मीरारोड-दहिसर दरम्यान रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबलनं त्याच्या वरिष्ठासह तिघांवर गोळीबार केला. यानंतर एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात थांबवण्यात आली आणि चौघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. ते कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

रेल्वे पोलीस दलात कॉन्स्टेबल असलेल्या चेतन सिंहनं त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यामध्ये रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. दहिसर ते मीरारोड दरम्यान ही घटना घडली. यावेळी जयपूर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं येत होती. गोळीबारानंतर चेतननं रेल्वेच्या डब्यातील चेन खेचली. त्यामुळे ट्रेन थांबली. यानंतर चेतननं रेल्वेतून उडी मारली. तो पळत सुटला. रेल्वे रुळांजवळ असलेल्या खारफुटीत शिरला. पण पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं अटक केली.
आधी सीनियरवर फायरिंग, मग ३ प्रवाशांना संपवलं; एक्स्प्रेसमधील गोळीबारामागचं कारण समोर
चेतन सिंह मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो बेचैन होता. त्यामुळे एएसआय टिकाराम मीणा यांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. चेतननं त्याच्याकडे असलेल्या ऑटोमॅटिक रिव्हॉल्व्हरनं गोळी झाडल्या. त्यात आरपीएफ एएसआय टिकाराम मीणा आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. चेततनं आधी टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर तो दुसऱ्या डब्यात गेला आणि त्यानं तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी चेतनला मीरारोडमध्ये पकडलं.

चेतन यांना मानसिक आजार असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपी चेतनची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ट्रेनमधील एस्कॉर्टिंग आरपीएफ टीममध्ये चेतनचा समावेश होता. चेतनचा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद झाला. त्यामुळे चेतन संतापला होता. चेतन आणि टिकाराम यांच्यात नेमका कोणत्या कारणामुळे वाद झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Train Firing: रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….
रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एस्कॉर्ट स्टाफ कॉन्स्टेबल चेतन कुमारनं सहकारी एस्कॉर्ट प्रभारी एएसआय टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर चेतननं सुरुवातीला बंदूक दाखवून प्रवाशांना घाबरवलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. चेन खेचून चेतननं ट्रेनमधून उडी मारली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed