जयपूर-मुंबई एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि इतर यंत्रणांना तातडीने एक्स्प्रेस ट्रेनचा ताबा घेतला आहे. पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चोरीच्या प्रयत्नातून ही घटना घडली, असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
जयपूर रेल्वे स्टेशनवरून रविवारी दुपारी दोन वाजता सुटलेली जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस आज पहाटे ६:५५ वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनवर पोहोचणार होती. ट्रेनला जयपूर आणि मुंबई दरम्यानचे ११६० किमी अंतर कापण्यासाठी १६ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो. ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे.
नेमकं काय घडलं?
जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्य हा प्रकार घडला. रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल चेतन सिंह यांनी चालत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी आजुबाजूला चार सहप्रवाशीही होते. या प्रवाशांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे समजते.